पुणे – ‘आरटीई’ ऑनलाइन प्रवेशाचा खोळंबाच

पुण्यासह सहा जिल्ह्यांत तांत्रिक अडचण कायम

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षक हक्क कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पुण्यासह सहा जिल्ह्यांत तांत्रिक अडचण अद्याप कायमच आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरुच झालेली नाही. राज्यातील उर्वरित जिल्ह्यामंध्ये 8 हजारांपेक्षा जास्त पालकांनी मुलांचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

‘आरटीई’ पोर्टलवर ऑनलाइन प्रवेशासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. गुगल मॅप अपलोड केल्यामुळे बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये प्रवेश अर्ज नोंदणीला बुधवारी दुपारपासून सुरुवात झाली आहे. पुणे, सांगली, परभणी, रायगड, सातारा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताच आलेले नाहीत. या जिल्ह्यांमधील “आरटीई’ प्रवेश पात्र शाळांची नोंदणी व पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने व इतर काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. ही अडचण लवकरच दूर करुन प्रवेश सुरळीत सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात “आरटीई’ प्रवेशासाठी पात्र असलेल्या एकूण 8 हजार 230 शाळांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. यात एकूण 1 लाख 1हजार 657 प्रवेशाच्या जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. यात सर्वाधिक शाळा या ठाणे जिल्ह्यात 652 व सर्वात कमी नंदुरबार मध्ये 47 एवढ्या नोंदविण्यात आल्या आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइनद्वारे 7 हजार 850 तर मोबाइल ऍपद्वारे 47 अर्जांची नोंदणी करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत यात वाढ होत चालली होती. पहिल्याच दिवशी नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजार 546 अर्जाची नोंदणी झाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)