पुणे – “वनाझ ते गरवारे महाविद्यालय मेट्रो’च्या उद्घाटप्रसंगी पंतप्रधान पुण्यात येणार होते. पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार ते सर्व रस्ते डांबरीकरण करून चकाचक करण्यात आले. मात्र, या चकाचक मोहिमेत प्रशासनाला केवळ रस्त्याची एकच बाजू दिसली, दुसऱ्या बाजूचा रस्ता “जैसे थे’ ठेवला. कर्वे रस्त्यावरील एका बाजूचा रस्ता “चकाचक’ तर दुसऱ्या बाजूचा “खड्डेमय’ असल्याचे सध्या चित्र आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर आले. विविध कार्यक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजन यासह वनाझ ते गरवारे महाविद्यालय मेट्रो मार्गाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते. गरवारे महाविद्यालय येथून ते आनंदनगरपर्यंत मोदी यांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे डेक्कनकडून एमआयटीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करून पांढरे पट्टे ओढण्यात आले. खड्डे बुजविण्यात आले. मात्र, हे केवळ पंतप्रधानांच्या सेवेसाठी आणि पुण्यातील रस्ते कसे चकाचक आहेत, हे दाखविण्याचा अट्टहास होता. त्याच्या उलट पौड रस्त्याकडून नळस्टॉप रस्त्याचे डांबरीकरण करण्यास प्रशासनाला विसर पडला, की पंतप्रधान त्या बाजूने जाणार नाही म्हणून लक्ष दिले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दोन्ही बाजूंचे डांबरीकरण का केले नाही?
कोंडी सोडविण्यासाठी तसेच मेट्रोच्या कामामुळे एसएनडीटीकडून नळस्टॉपकडे येणारी वाहने कॅनॉलमार्गे फिरवून लॉ-कॉलेज रोडने इच्छितस्थळी वळविण्यात आली. तर, लॉ-कॉलेजकडून एसएनडीटीकडे जाणाऱ्या वाहनांना दोन्ही बाजूचे रस्ते खुले करण्यात आले. पंतप्रधान येणार म्हटल्यावर डाव्या बाजूचा रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, उजव्या बाजूचा रस्ता जैसे थे ठेवला. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे, लोखंडी जाळ्या खचलेल्या आणि पदपथ तुटलेल्या अवस्थेत आहे. प्रशासनाने अट्टहास केलाच होता तर दोन्ही बाजूंचे डांबरीकरण का केले नाही? या अपुऱ्या कामामुळे वाहनाचलक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.