पुणे – वाद सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे ठार मारण्याचा केल्याप्रकरणात एकाला 25 हजार रुपयांचा जामीन सत्र न्यायाधीश प्रदीप अष्टुरकर यांनी मंजुर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करण्याच्या अटीवर न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
रंगाप्पा अजंनय्या गुत्तेदार (वय 25, रा. पौड रस्ता, कोथरूड) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. राहुल नायर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या नावाचा उल्लेख एफआयआरमध्ये नाही. मुख्य आरोपीसोबत इतर दोघे ते तिघे असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्याच्याकडून लोखंडी विळा जप्त करण्यात आला आहे. मात्र, फिर्यादीच्या नाका आणि कानाजवळ किरकोळ जखमा असल्याचे वैद्यकीय पुराव्यावरून दिसून येत आहे.
त्यामुळे त्याने डाव्या कान आणि मानेवर वार केले म्हणता येणार नाही. तसे असते जर जखमा अधिक तीव्र असल्या असत्या. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. राहुल नायर यांनी केली. ही घटना 21 ऑगस्ट 2020 रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊच्या सुमारास कोथरूड येथील गोसावी वस्ती येथे घडली.
या प्रकरणात चौघांवर गुन्हा दाखल आहे. रफिक अमिन संकपाळ (वय 22, रा. गोसावी वस्ती, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मित्र शंकर विटकर आणि ओंकार थिटे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादींना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.