वश्रांतवाडी – पेट्रोल, डीझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले असून महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे, यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी “एक रुपयात एक लिटर पेट्रोल’ वाटपाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम म्हणजे केंद्रातील मोदी सरकारला चपराक असल्याचे आमदार सुनील (आण्णा) टिंगरे यांनी सांगितले.
शशीआण्णा टिंगरे सोशल फाउंडेशन आणि जाणता राजा प्रतिष्ठानच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरी परिसरातील नागरिकांना एक रुपयात, एक लिटर पेट्रोल वाटप करण्यात आले. याप्रसंगी टिंगरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, स्थानिक आमदार सुनील टिंगरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशीकांत(आण्णा) टिंगरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील टिंगरे, धानोरीतील ग्रामस्थ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते शशिकांत (आण्णा) टिंगरे यांनी केले होते. इंधनाचे दर गगनाला भिडले असताना केवळ एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळणार असल्याने गोकुळनगरमधील पेट्रोल पंपावर नागरिकांनी रांगा लावल्या होता. हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.
महागाई व इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यामुळे एक दिवसासाठी का होईना जनतेला दिलासा देण्यासाठी एक रुपयात एक लिटर पेट्रोल वाटप करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान आयोजित या उपक्रमाचा सुमारे 1850 पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला. आगामी काळात असेच समाजोपयोगी व विधायक उपक्रम राबविण्यार आहे.
– शशिकांत (आण्णा) टिंगरे