पुणे – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून लोखंडी कोयता आणि रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला सत्र न्यायाधीश एस.एन.सोनवणे यांनी अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
ओंकार ऊर्फ सोन्या महादेव लिंगे असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. हेमंत कांबळे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. अमोल काटे (वय 34) असे घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ राहुल (वय 36, रा. दापोडी ) याने याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल असून, एक अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना 21 मे 2020 रोजी दापोडी येथे घडली.
एका आरोपीचे आणि अमोल काटे याचे टपरीवर सिगारेट घेताना सुट्या पैशावरून वाद झाले होते. याचा राग मनात धरून अमोल याला डोक्यात लोखंडी कोयता, रॉडने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्ह्यातील हत्यारे इतर आरोपींकडून जप्त झाली आहेत. आमच्याकडे काही रिकव्हरी नाही. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला अहे. यामध्ये षडयंत्राने आमचे नाव गोवण्यात आले आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन देण्याची मागणी ऍड. हेमंत कांबळे यांनी केली.