कोथरूड – वारंवार नोटीस देऊनही वाहनावरील दंड वेळेत न भरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी मोहीम वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. चांदणी चौकात दोन दिवसांपासून ही मोहीम सुरू असून, शुक्रवारी (दि. 3) दिवसभरात तब्बल सव्वा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिसांकडून “ऑन द स्पॉट’ दंड वसुली करण्यात येत असल्याने नियम मोडणाऱ्या, दंड भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे.
ओव्हरस्पीड, झेब्रा क्रॉसिंग, विना सिटबेल्ट किंवा हेल्मेट यासह अन्य वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांना कॅमेरामध्ये कैद करून दंड आकारला जातो. त्याबाबत संबधित चालकांना मेसेज येतो. तसेच दंड भरण्याबाबत वारंवार नोटीस देऊनही दुचाकी किंवा कारचालकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी दुर्लक्षित वाहने सध्या पोलिसांच्या “टार्गेट’वर आहेत. चांदणी चौकात बावधन वाहतूक विभागाकडून वाहन तपासणी मोहीम सुरू असून, त्यामध्ये वाहनांवरील दंडाची पाहणी करून दंड वसूल केला जात आहे. त्यासाठी सकाळपासून चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. मुळशीकडून बावधनला येणारी वाहने थांबवून त्यांच्या वाहनावरील दंड आहे की नाही याची तपासणी करून कारवाई केली जात आहे. धक्कादायक म्हणजे बड्या आणि अलिशान कारवर तब्बल 30 ते 40 हजारपर्यंत दंड असल्याचे या तपासणी मोहिमेतून समोर आले आहे.
माझ्या गाडीने तुम्हाला इच्छितस्थळी पोहचवतो…
पोलिसांनी दंडाची रक्कम सांगितल्यावर ती भरण्यावरून पोलीस आणि वाहनचालकांमध्ये शाब्दीक वाद होत आहेत. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शांत राहून पैसे भरा आणि गाडी घेऊन जा, असा पवित्रा घेतला आहे. पैसे नाही, माझे अकाउंट चेक करा, दोन दिवसांत भरतो, एवढे पैसे मी कोठून आणू, मी कोर्टात पैसे भरतो, गाडी माझी नाही, अशी कारणे सांगण्यात येत असली तरी तुमची गाडी जमा करा, मी माझ्या गाडीने तुम्हाला सोडायची व्यवस्था करतो. नसेल तर दंड भरून तुम्ही गाडी नेऊ शकता, असे रोखठोक उत्तर पोलीस देत आहेत.
कारवाईमध्ये सव्वा लाखांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या वाहनावरील दंड असेल तर तात्काळ भरावा. हा कार्यवाहीचा भाग आहे. कारवाईवेळी कोणतीही कारणे सांगू नयेत.
– राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग