पुणे – रमजानच्या पार्श्‍वभूमीवर खजुराची 100 टन आवक

गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात 10 ते 20 टक्के वाढ


50 हून अधिक प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध

पुणे – मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात खजुराला विशेष महत्त्व असते. खजूर खाऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे. या पार्श्‍वभूमीवर मार्केटयार्डातील भुसार बाजारात 100 टन खजुराची आवक झाली आहे. इराण, इराक आणि सौदी अरब येथून 50 हून अधिक प्रकारची खजूर विक्रीसाठी बाजारात आले आहे. यात 70 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत प्रतिकिलो किंमतीच्या खजुराचा समावेश आहे. त्याच्या खरेदीसाठी शहरातील विविध बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात लहान-थोर कडक उपवास करत असतात. यावेळी, सहेरी आणि इफ्तारसाठी खजुराला मोठे महत्त्व असते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन शहरातील व्यापाऱ्यांनी इराण, इराक आणि सौदी अरब येथून खजूर आयात केली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा खजुराच्या किमतीमध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांनाही रमजान साजरा करता यावा, यासाठी बाजारात 70 रुपये किलोपासून वेगवेगळ्या जातींचे खजूर उपलब्ध झाले आहे. दरम्यान, अज्वा जातीच्या खजुराचे झाड महमंद पैगंबर यांनी लावल्याची भावना असून त्याचा आस्वाद घेण्यास मुस्लीम बांधव विशेष पसंती देतात. हे खजूर मधामध्ये भिजवून त्यामध्ये केशर टाकून खाण्यास प्राधान्य दिले जात असल्याने त्याला विशेष मागणी आहे. परदेशातील खजूर हे चवीला आणि आरोग्यदृष्ट्या फायदेशीर असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

भारतात खजुराचे फारसे पीक नाही. मात्र, रमजानसाठी परदेशातून खजुराची आवक होत असल्याचे सांगून व्यापारी दिनेश सेठ म्हणाले, “सध्यस्थितीत इराणवरून बम, मझाफती, सौदीअरब वरून फर्ध, खलाझी, लुलू तसेच इराकमधून झहादी खजुराची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यंदा इराकमध्ये लाल खजुराचे पीक मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याची आवकही मोठी आहे. तर, इराणने निर्यातीसंदर्भात धोरण बदल्याने तेथून भारतात होणाऱ्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. सहेरी आणि इफ्तारच्या वेळी पाच खजूर खाऊन पाणी पिऊन उपवास सोडण्यात येतो. हृदयासाठी हे फळ चांगले असून त्यामुळे वजन वाढते. रक्तवाढीसाठीही खजूर खातात. मात्र, हे फळ उष्ण असल्याने उपवासादरम्यान चार ते पाच खजूर खाणे उपयुक्त ठरते.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.