पुणे – आळंदी यात्रा सोहळ्यामध्ये महावितरणकडून २४ तास वीजसेवा देण्यासाठी ३५ अभियंते व जनमित्रांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच अखंडित वीजपुरवठा व भाविकांच्या वीजसुरक्षेसाठी विविध उपाययोजनांसह १० ठिकाणी अतिरिक्त वितरण रोहित्र बसविण्यात आले आहेत. त्यासाठी महावितरणची ही यंत्रणा सज्ज झाली असून बुधवार (दि. १३)पर्यंत विशेष सेवा कायम राहणार आहे.
आळंदी येथे कार्तिकी एकादशी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी सुरळीत वीजपुरवठा व सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच पवार यांनी आळंदी येथे भेट देऊन वीजविषयक कामांची पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश भगत, उपकार्यकारी अभियंता विजय गारगोटे आदींची उपस्थिती होती.
आळंदी यात्रेच्या सोहळ्यापूर्वी महावितरणकडून आळंदी शहर व मंदिर परिसरात विविध १० ठिकाणी २०० एमव्हीएचे अतिरिक्त वितरण रोहित्र बसविण्यात आले. इतर सरकारी यंत्रणेशी समन्वय साधण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच दर्शनबारी, इंद्रायणी घाट, प्रदक्षिणा रस्ता येथील ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ओव्हरहेड तारांऐवजी एरीयल बंच केबल लावण्यात आली आहे. परिसरातील फिडर पीलर्स सुरक्षित जागी स्थानातंरीत करण्यात आले आहे.
यासह संपूर्ण वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीच्या कामांत विविध तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरम्यान भासा आसखेड धरणातून चाकण एमआयडीसी जलकेंद्राद्वारे आळंदी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून तात्काळ पर्यायी उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
आळंदी यात्रेसाठी २४ तास वीजपुरवठा व ग्राहकसेवा देण्यासाठी वरिष्ठ अभियंत्यांसह सहायक अभियंता संदीप पाटील, संदीप कुऱ्हाडे, अविनाश सावंत, मंगेश सोनवणे, नितीन माटे, विजय पाटील, सुरेश माने, मदन मुळुक यांची आणि २५ जनमित्रांची विविध ठिकाणी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.