पुणे – वाहतूक नियमभंगामध्ये ‘अल्पवयीन’ आघाडीवर

थेट पालकांवरच भरला जातोय खटला

– कल्याणी फडके

पुणे – वाहतूक नियम मोडण्यामध्ये अल्पवयीनांचे प्रमाण मोठे आहे. याला बहुतांशी पालकच जबाबदार असल्याचे दिसत आहे. मुलांच्या जीवाबरोबरच कायद्याची कोणतीही पर्वा न करता पाल्यांच्या हातात सहज गाडी दिली जाते. अशा “बेफिकीरपणे’ गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र, पालकांनी या कारवाईची दखल न घेतल्याने परिस्थिती मात्र “जैसे थे’ असल्याचे दिसत आहे.

मुलगा दहावीला गेला, की त्याला ट्युशनसाठी गाडी घेऊन दिली जाते. तसेच घरातील इतर कामांसाठीही अल्पवयीनांच्या हातीगाडी दिली जाते. मुलांच्या हातात गाडी आली, की ते सर्रास भरधाव वाहन चालवतात. यामुळे अनेकदा अपघात होतात. यामुळे वाहतूक शाखा यापुढे अल्पवयीन मुलगा वाहन चालवताना सापडला तर थेट त्याच्या पालकांनाच समज देणार आहे. यासंदर्भात वाहतूक विभागाकडून शेकडोंच्या संख्येत कारवाई होत आहे. मोठ्या प्रमाणावर कारवाई करून देखील “या’ वाहनचालकांचे प्रमाण “जैसे थे’ आहे. यामध्ये पकडल्या जाणाऱ्या मुलांच्या पालकांना वाहतूक पोलीसांकडून वारंवार समज दिली जाते. याशिवाय पालकांवर कारवाई करून खटला देखील भरला जातो. अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याबरोबर “त्यांना’ वाहन चालवण्यास देऊ नये, असे आवाहनही वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. नियम आणि कायदे करून देखील नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन परवाना असल्याशिवाय वाहन चालवण्यास परवानगी नसते. परंतु मुलांच्या हातात पालकांनी गाडी दिल्याने नियमभंग होण्याचे प्रमाण अधिक आहे. “मोपेड’ गाड्या चालवण्यापेक्षा हल्लीच्या अल्पवयीन मुलांमध्ये “गिअर’ गाड्या “बुंगाट’ पळवण्याची “क्रेझ’ दिसून येत. वेगाने गाडी चालवणे, “ट्रिपल सीट’ फिरणे, “कट’ मारणे, ओव्हरटेक करणे, सिग्नल न पाळणे आदींसह कायद्याची माहिती नसल्याने अल्पवयीन मुलांकडून वाहतुकीचे नियमभंग होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अल्पवयीन मुलांकडे वाहन परवाना नसतानादेखील पालक त्यांच्या हातात वाहन देतात. यामुळे नियमभंग होतो. याला पालक जबाबदार असल्याने मुलांसह पालकांवरही कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार मोटर व्हेईकल ऍक्‍टप्रमाणे पालकांवर खटलेही दाखल केले जातात.
– जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक.


सार्वजनिक वाहतुकीची परिस्थिती पाहता काही कारणास्तव मुलांना गाडी देणे अपरिहार्य असते. मुलांची मानसिकता तसेच गरज लक्षात घेता पालकांना गाडी देण्याचा निर्णय घ्यावा लागतो. गाडी देताना मुलांना वाहतूक नियमांबद्दल पालकांनी सांगितले पाहिजे. तसेच मुले गाडी चालवताना त्याची जबाबदारी पूर्णपणे पालकांनी घेतली पाहिजे.
– श्रद्धा भातलवंडे, पालक

लायसन्स आहे, पण “50 सीसी’ची वाहनेच नाहीत
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 16 ते 18 वयोगटातील मुलांसाठी पालकांच्या संमतीने “विशेष’ लायसन्स दिले जाते खरे. हे लायसन्स “50 सीसी’पेक्षा कमी क्षमता असणाऱ्या गाड्या चालवण्यासाठी दिले जाते. पण आताची “अपडेट’ परिस्थिती पाहता बहुतांश गाड्यांची “50 सीसी’पेक्षा जास्त आहेत. पूर्वी 50 सीसीच्या गाड्या धावत असल्याने, या पद्धतीचे लायसन्स देणे योग्य होते. मात्र सध्या बाजारात कोणतीच गाडी 50 सीसीची उपलब्ध नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांकडून लायसन्स “50 सीसी’पेक्षा जास्त क्षमतेची गाडी चालवताना वापरले जाते. सध्याच्या काळामध्ये वारंवार जास्त पॉवर आणि स्पिडच्या गाड्या वापरण्याकडे कल आहे. ग्राहकांची ही मानसिकता लक्षात घेऊन वाहन उत्पादन कंपन्यांनी “50 सीसी’च्या वाहनांचे उत्पादन केव्हाच बंद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.