पुणे – पहिल्याच दिवशी आदर्श आचारसंहितेला “हरताळ’

शहरभर राजकीय फ्लेक्‍सची गर्दी : प्रशासनाला फलक काढण्याचा विसर

पुणे – महापालिकेच्या रिक्‍त झालेल्या नगरसेवकांच्या जागा तसेच महापालिका हद्दीत समाविष्ट 11 गावांसाठीच्या प्रभागाच्या पोट निवडणुकीसाठी शुक्रवारपासून या प्रभागांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, या आचारसंहितेला पहिल्याच दिवशी हरताळ फासला गेल्याचे चित्र शहरभर आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याने संपूर्ण शहरभरात राजकीय फ्लेक्‍सची गर्दी झाली असून महापालिका प्रशासनाला चक्‍क हे फलकच काढण्याचा विसर पडला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील प्रभाग 42 “अ’, “ब’ तसेच प्रभाग क्रमांक 1 कळस-धानोरीच्या रिक्‍त झालेल्या जागेसाठी जून महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली असून महापालिका निवडणूक कार्यालयाने त्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने ही आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर करायच्या कार्यवाहिची सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने या प्रभागातील मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही, घोषणा कोणत्याही मंत्री, आमदार तसेच खासदार, नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही.

या शिवाय, शासकीय मालकीच्या जागेत, महापालिकेच्या परिसरात तसेच हद्दीत सर्व शासकीय कार्यलाये आणि इमारतींचा शासकीय भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, कटआऊट बॅनर्स झेंडे काढणे बंधनकारक आहे, तसेच सर्व प्रकारच्या शासकीय मालमत्तेवरील राजकीय जाहिराती काढणे तसेच खासगी मिळकतींवरील अनधिकृत जाहिरातीही काढणे बंधनकारक आहे. मात्र, शुक्रवारी दिवसभरात पालिकेकडून याबाबत काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे महापालिका भवनासह शहरात बहुतांश ठिकाणी राजकीय फलकांची गर्दी झालेली होती. तर महापालिकेच्या अनेक कार्यालयांतही राजकीय नेत्यांची चित्र तसेच पक्षाची चिन्हे झाकलेली नाहीत. त्यामुळे शहरात पोट निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊनही पहिल्याच दिवशी आदर्श आचारसंहितेला हरताळ फासला गेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.