पुणे : पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील ५००० हून अधिक नागरिकांनी पुणे रिव्हर रिव्हायव्हलने आयोजित केलेल्या चिपको पदयात्रेत भाग घेतला आणि नदीकाठच्या परिसंस्थांच्या रक्षणासाठी अभूतपूर्व पाठिंबा दर्शविला. बाणेरच्या कलमाडी हायस्कूलपासून राम- मुळा संगमापर्यंत गेलेल्या पदयात्रेत शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण तज्ज आणि विविध वस्त्या आणि सोसायट्यांमधील रहिवासी सहभागी झाले होते.
याप्रसंगी पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुण्यातील नदीकाठच्या देवराया, बनराया आणि जुन्या वाढलेल्या झाडांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच नदी आपली जबाबदारी आहे, अशा भावना अनेक लोकांनी व्यक्त केल्या.
पदयात्रेनंतर शेकडो नागरिकांनी नदीकाठच्या प्राचीन झाडांना आलिंगन दिले आणि या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्याबाबत भावना व्यक्त केल्या. नदी की बात, अशा आशयाची हजारो पत्रे पंतप्रधानांना लिहिण्यात आली. लहान मुलांनी गाणी, कविता सादर केल्या. सयाजी शिंदे यांनी स्वतः लिहिलेली कविता म्हटली.
प्रमुख मागण्या
नदीत सांडपाणी सोडणे बंद करा. नदीची रुंदी कमी करू नका, भराव टाकू नका. नदीकाठचे वृक्ष, देवराया आणि पाणथळ जागांचे रक्षण करा. भूजल स्रोतांचे जतन आणि रक्षण करा. नदीकाठ सुधार प्रकल्प पर्यावरणपूरक करा. त्यासाठी स्थानिक आणि निसर्ग-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करा. निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राखत नागरिकांचा, तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग घ्या, अशा मागण्या यावेळी पुणे रिव्हर रिव्हायव्हलकडून करण्यात आल्या.
पीएमसी आणि पीसीएमसी दोन्ही भागांतील मिळून सुमारे ८५ संघटना आता नदी संवर्धनासाठी काम करायला एकत्र येत आहेत. यात मुठा, मुळा, पचना आणि इंद्रायणी नद्यांच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित केले जाईल. आजचा कार्यक्रम ही फक्त सुरुवात आहे. निसर्गपूरक विकासाची सांगड घालण्याची मागणी आम्ही करतच राहू.
– शैलजा देशपांडे, जीवित नदी संस्था, संस्थापक