पुणेच ‘ऑक्सिजन’वर

राज्यात सर्वाधिक ऑक्‍सिजनची गरज पुण्याला


गरजेच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे आरोग्य विभागासमोर अडचणी वाढल्या


वाढत्या करोना बाधितांमुळे गरज आणखी वाढणार

पुणे – शहर आणि जिल्ह्यात करोनाच्या अत्यवस्थ बाधितांना ऑक्‍सिजन पुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. यात राज्यातील एकूणपैकी 41.26 टक्के ऑक्‍सिजनची गरज पुणे विभागाला आहे. यात एकट्या पुणे जिल्ह्याला 27.30 टक्के ऑक्‍सिजनची गरज असल्याचे समोर आले आहे. मात्र, गरजेच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे आरोग्य विभागच “ऑक्‍सिजन’वर आला आहे. भविष्यात त्याची गरज वाढणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे.

राज्यात 1 हजार 2 कोविड रुग्णालयांत दाखल अत्यवस्थांसाठी 809 टन ऑक्‍सिजनची गरज असताना तुलनेत 95 टक्के ऑक्‍सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये विभागानुसार माहिती घेतली तर एकट्या पुणे विभागात (पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर) 333.78 टन ऑक्‍सिजनची गरज असून, त्यामध्येही केवळ पुणे जिल्ह्यात 220 टनांची मागणी आहे. अन्य जिल्ह्यांत याचे प्रमाण 11 ते 50 टन इतके आहे.

पुणे शहरात सध्या सक्रीय बाधितांची संख्या 17,393 असून, त्यातील 3 हजार 372 बाधित ऑक्‍सिजनवर आहेत. तर 479 बाधित हे व्हेंटिलेटरवर आहेत. ग्रामीण भागासह सातारा, सांगली, सोलापूर, नगरसह अन्य जिल्ह्यांतील बाधित उपचारांसाठी पुण्यात येत आहे. त्यामुळे बाधित आणि अत्यवस्थ बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ऑक्‍सिजनची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे.

पुण्याची गरज 19 जिल्ह्यांऐवढी
राज्यात एकट्या पुणे जिल्ह्याची ऑक्‍सिजनची मागणी 220 टन आहे. अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक विभागांतील तब्बल 19 जिल्ह्यांना जितका ऑक्‍सिजनची गरज आहे, तेवढी गरज एकट्या पुणे जिल्ह्याला आहे. त्यावरून पुण्यातील करोनाच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते. मुंबईलाही 91.34 टन, तर ठाणे/पालघरला विभागाल 112 टन ऑक्‍सिजनची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.