पुणेच ऑक्‍सिजनवर! नवे रुग्ण घेणे तात्पुरते केले बंद

पुणे – शहरातील रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारा ऑक्‍सिजनचा साठा केवळ उपचार घेत असलेल्या रुग्णांपुरताच आहे. त्यामुळे नवे रुग्ण दाखल करून घेणे तात्पुरते बंद करण्यात आले आहे. यामुळे श्वास घेता न येणाऱ्या आणि ज्यांना ऑक्‍सिजन लागणार आहे अशा रुग्णांचे हाल होत असून, ऑक्‍सिजनचा यक्षप्रश्‍न सध्या महापालिका प्रशासनापुढे उभा आहे.

शहरात दररोज 250 मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्‍सिजन लागतो. त्यातील 40 मेट्रिक टन ऑक्‍सिजन महापालिका रुग्णालयांमध्ये वापरला जातो. सध्याही एवढाच ऑक्‍सिजन पुरवला जातो, परंतु रुग्णसंख्या अचानक वाढल्याने त्याची मागणी वाढली आणि त्याचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. उत्पादकांकडून ऑक्‍सिजनचा पुरवठा होत नसल्याने पुरवठा करणारेही हतबल झाले आहेत. याशिवाय अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यात ऑक्‍सिजन पुरवठा कसा सुरळीत होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महापालिका हद्दीतील करोना ऍक्‍टीव्ह रुग्णसंख्या 55 हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामध्ये खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे साडेपाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण ऑक्‍सिजनवर तर सुमारे बाराशे रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यासाठी तर ऑक्‍सिजन लागतोच, परंतु याशिवाय गृहविलगीकरणात असलेल्या आणि ज्यांना बेड मिळाले नाहीत अशा ऑक्‍सिजन लेव्हल कमी झालेल्या रुग्णांनाही घरगुती ऑक्‍सिजन सिलेंडर लागतात. तीही गरज भागवणे आवश्‍यक आहे.

या संदर्भात महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या महापालिका आयुक्तांबरोबर बैठका सुरू आहेत. आयुक्तांनीही यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मागणी नोंदवली आहे. मात्र अद्याप यावर काहीच तोडगा निघाला नाही. ही परिस्थिती केवळ पुण्यातच नसून, संपूर्ण राज्यात निर्माण झाली आहे.

महापालिकेकडे पुरेसा ऑक्‍सिजन साठवण्याची क्षमता आहे. बाणेर येथील जंबो, नायडू रुग्णालय या ठिकाणी साठवणुकीची सिस्टिम करण्यात आली आहे. मात्र ऑक्‍सिजनचा पुरवठाच होत नसल्याने महापालिका प्रशासनही हतबल आहे. यासाठी ऑक्‍सिजन लेव्हल कमी असलेल्या म्हणजे गंभीर रुग्णांना दाखलच करून घेता येणार नाही. ही व्यवस्था सुरळीत होण्याची वाट पहावी लागणार आहे, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.