Pune : राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या पुणे खंडपीठाकडे महिन्याला सरासरी 60 हून अधिक तक्रारी

पुणे : पर्यावरणाबाबत सर्वसामान्यांमध्ये वाढलेली संवेदनशीलता आणि कायद्याबद्दलची जागरूकता वाढल्यामुळे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) पर्यावरणीय नियमांचे उल्लंघनाच्या तक्रारींचा ओघ वाढला आहे. पुणे न्यायपीठाकडे दर महिन्याला सरासरी 60 हून अधिक याचिका दाखल होत आहे. याचिकेद्वारे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून उभे राहणारे बांधकाम प्रकल्प, लहान-मोठ्या कारणांसाठी होणारी वृक्षतोड, सार्वजनिक कचरा व्यवस्थापनातील अपयशासह वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्यांच्या विरोधात नागरिक न्यायाधिकरणाकडे दाद मागत आहे.
पर्यावरणीय दुष्पपरिणामांचा विचार न करता राबविण्यात येणार्या प्रकल्पांच्या विरोधात सर्वसामान्यांना दाद मागता यावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे सध्या तक्रारींचा ओघ वाढत आहे. यामध्ये, वृक्षतोडीपासून ते शहरातील गंभीर पर्यावरणीय समस्यांवर आधारित अनेक तक्रारींचा समावेश आहे. सद्यःस्थितीत देशभरात दिल्ली येथील मुख्य न्यायपीठासह पाच न्यायपीठ कार्यरत आहे.
यामध्ये, पुणे, चेन्नई, भोपाळ आणि कोलकाता या न्यायपीठांमध्ये पर्यावरणासंबंधित दाखल याचिकांवर सुनावणीचे काम चालते. यात प्रामुख्याने पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन करून साकारण्यात येणारे विकास प्रकल्प, खासगी बांधकाम प्रकल्प, पर्यावरणावर परिणामांचे मूल्यांकन अहवालांशिवाय ठिकठिकाणी वृक्षतोड, डोंगरफोड, जलाशयांवरील अतिक्रमण, जल, वायू, ध्वनिप्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन या समस्यांचा समावेश आहे.
पुणे न्यायपीठावर तीन राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांचा भार
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010 अंतर्गत 18 ऑक्टोंबर 2010 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर, 25 ऑगस्ट 2013 रोजी शहराला सर्वोच्च न्यायालयाच्या दर्जाचे स्वतंत्र न्यायपीठ मिळाले. यादरम्यान, पुणे न्यायपीठाकडे क्षेत्राशी संबंधित सर्व दावे या न्यायपीठाकडे हस्तांतरित करण्यात आले. यामध्ये, महाराष्ट्रासह गोवा, गुजरात तसेच केंद्रशासित असलेल्या दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली आदी प्रदेशांतील दाव्यांचा समावेश आहे.
देशात जानेवारी 2025 अखेर पर्यंत एकूण याचिकांची आकडेवारी
दाखल याचिका……………..48 हजार 590
निकाली याचिका……………44 हजार 283
एकूण प्रलंबित याचिका……..04 हजार 307
मागील वर्षभरातील याचिकांचा आढावा
न्यायपीठ–दाखल याचिका–निकाली याचिका– प्रलंबित याचिका
दिल्ली–2 हजार 248–1 हजार 855–1 हजार 962
चेन्नई–579–359– 677
भोपाळ–526– 398–277
पुणे–768–400–1 हजार 063
कोलकाता–418–290– 328
एकूण–4 हजार 639–3 हजार 302–4 हजार 307
मागील काही वर्षात पर्यावरणाबाबत जागृती, संवेदनशीलता वाढली आहे. त्यामुळे पर्यावरणाविषयी तक्रार दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात दावे दाखल होण्यामध्ये दिल्लीनंतर पुण्याचा दुसरा क्रमांक आहे. – ॲड. आकाश मुसळे





