पुणे – केंद्र शासनाने खाद्यतेलाच्या वाढत्या किमती लक्षात घेता आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला. यानिर्णयामुळे स्थानिक बाजारामध्ये खाद्यतेलांच्या किमती अंदाजे प्रति किलो 15 ते 20 रुपये इतक्या कमी होणे अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ ग्राहकांना मिळावा, यासाठी योग्य ती कार्यवाही सहकार, कृषी, पुरवठा विभागाकडून करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
केंद्र शासनाने क्रुड पाम तेल, क्रुड सूर्यफूल तेल यांचे आधारभूत शुल्क 2.5 टक्के वरून 0 टक्के कमी केले आहे. क्रुड तेलाच्या आयातीवर आकारला जाणारा कृषी उपकर 20 टक्के वरून 7.5 टक्के पर्यंत कमी, तर सूर्यफूल तेलाच्या आयातीवर आकारला जाणारा कृषी उपकर 20 टक्के वरून 5 टक्के पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे सद्यस्थितीत क्रुड पाम तेलाच्या आयातीवर 7.5 टक्के आणि क्रुड सोयाबीन तेल व क्रुड सूर्यफूल तेलाच्या आयातीवर 5 टक्के इतके आयात शुल्क आकारले जात आहे. तसेच सूर्यफूल तेल यांचे आधारभूत शुल्क 32.5 टक्के वरून 17.5 पर्यंत कमी करण्यात आले आहे.