पुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’

क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच दिली जातेय लसीकरणाची यादी

पुणे – शहरात करोना लसीकरण केंद्रावरील ऑन स्पॉट नोंदणीत आता महापालिकेच्याच क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून “घुसखोरी’ केली जात असल्याचे समोर येत आहे. केंद्रावर थेट गेलेल्या 20 नागरिकांची नोंदणी होणे अपेक्षित असताना; केवळ सात ते आठ नागरिकांनाच थांबवून उर्वरित नागरिकांना परत पाठवून दिले जात आहे. 

तसेच, याबाबत नागरिकांनी वाद अथवा गोंधळ घातल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच थेट उर्वरीत यादी आली असल्याचे सांगत नागरिकांना हुसकावून लावण्यात येत आहे. सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावरील स्व. रमेश वांजळे जलतरण तलावाच्या ठिकाणी असलेल्या केंद्रावर शनिवारी हा प्रकार घडला. त्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्‍त केल्यानंतर या केंद्रावर काही डोस वाढवून देत या वादावर पडदा टाकण्यात आला.

केंद्रावर ऑनस्पॉट नोंदणीसाठी सकाळीच ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणात गर्दी करतात, यासाठी प्रत्येक केंद्रावर केवळ 20 डोस उपलब्ध असताता, अनेकदा नगरसेवकच कार्यालयातून टोकन देऊन नागरिकांना लस देण्यासाठी पाठवतात.

त्यावरून मोठा गोंधळ झाल्यानंतर, आता थेट आलेल्या नागरिकांना सुरळीत लस मिळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आता ऑनस्पॉट नोंदणीत लसीकरण केंद्राची जबाबदारी असलेले क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारीही नावांची यादी पाठवत असून त्यांच्याकडून 5 ते 10 नावांची यादी पाठविली जात आहे. त्यामुळे कर्मचारी सकाळीच ऑनस्पॉट नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना नोंदणी नसल्याचे सांगत हुसकावून लावत आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.