पुणे – उद्यानांतील अश्‍लील चाळ्यांना अभय

सुरक्षा कर्मचारीच नसल्याचे कारण देऊन दुर्लक्ष


22 सीसीटीव्ही असूनही काहीच उपयोग नाही


महापालिकेच्या दुर्लक्षाने “सिनियर सिटीझन्स’ वैतागले

पुणे – महापालिकेच्या सार्वजनिक उद्यानांमध्ये अश्‍लील चळे करणाऱ्यांना महापालिका प्रशासनाने कारवाई न करून एकप्रकारे अभयच दिले आहे. त्यामुळेच सीसीटीव्ही बसवूनही हे प्रकार बंद झाले नसल्याचे दिसून येते.

सारसबागेसारख्या ठिकाणी संध्याकाळी अनेक “सिनियर सिटीझन्स’ फिरायला येतात. ट्रॅकवर फिरताना झाडांमध्ये अतिशय वाईट पद्धतीने चाळे सुरू असतात. त्यामुळे तेथून जाणाऱ्यांना अक्षरश: लाज वाटते. शेजारून कोणी चालले आहे, याचे भानही या जोडप्यांना नसते, किंवा जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

येथे येणाऱ्या जोडप्यांमध्ये अल्पवयीनांपासून ते प्रौढांपर्यंत व्यक्ती असतात. त्यामुळे कोणा एका वयाकडे बोट दाखवता येत नाही. दिवसभर उद्याने उघडीच असल्याने आणि दुपारी कुटुंब कोणी येत नसल्याने या लोकांचे फावते. त्यामुळे अगदी संध्याकाळी 7 पर्यंतचा वेळ त्यांना याठिकाणी काढता येतो.

अन्य उद्यानांच्या तुलनेत सारसबागेचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे तेथे जास्त सुरक्षा रक्षकांची गरज आहे. परंतु त्यांची अपुरी संख्या असल्याने अगदी कानाकोपऱ्यात ते पोहोचत नाहीत. याचाच फायदा उठवून हे प्रकार केले जातात. मात्र त्यावर उपाय म्हणून सीसीटीव्ही बसवले आहेत आणि सुरक्षा रक्षकांच्या केबिनमध्ये त्याची मॉनिटरींग सिस्टिम आहे. त्यात दिसत असूनही हे प्रकार रोखले जात नाहीत. सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे त्यावर केविलवाणे, न पटणारे कारण दिले जात आहे. मात्र, हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर “आता कारवाई करू,’ असे उत्तर तेथील सुरक्षा रक्षकांकडून दिले गेले.

कोणीतरी गांभीर्याने घ्या
मागील वर्षी भरारी पथकाने याठिकाणी कारवाई केली होती. त्यावेळी अनेक जोडप्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यांच्या पालकांना बोलावून पाल्याच्या या प्रकारांची माहिती देण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर पुन्हा असे प्रकार न करण्याविषयी नोटही लिहून घेण्यात आली होती. असे असतानाही हे प्रकार अद्याप थांबले नाहीत. मात्र, पुन्हा भरारी पथक आलेही नाही. वास्तविक त्या-त्या झोनल कमिशनरने या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. मात्र, ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेतली जात नाही.

कारवाईवेळी पोलीस असावेत
“ज्यांच्यावर कारवाई झाली ती जोडपी पुन्हा येत नाहीत, रोज नवीन जोडपी येतात. त्यामुळे किती जणांवर कारवाई करायची हा प्रश्‍न आहे,’ असेही कारण सुरक्षा रक्षकांनी दिले. एवढेच नव्हे, तर एखाद्यावर कारवाई केल्यास, ती मुले अन्य उडाणटप्पू मित्रांना घेऊन दमदाटी करून जातात. अशावेळी पोलिसांकडे तक्रार करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही तो केला जात नाही. मुळात ही कारवाई करतानाच पोलिसांना बरोबर घेऊन केल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो, परंतु त्याबाबत उदासीनता दाखवली जाते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.