नवी दिल्ली -अमेरिकेतील एका पोर्टलने भारतातील आठ प्रमुख शहरांमधील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा अभ्यास करून त्या शहरांची क्रमवारी प्रसारीत केली आहे. त्यानुसार पुणे हे देशातील पहिल्या नंबरचे शहर ठरले असून दिल्ली हे सर्वात तळातले शहर ठरले आहे.
अमेरिकेतील न्यूज कॉर्पस आणि त्यांचा ऑस्ट्रेलियन भागीदार गट आरईए यांच्या संयुक्त रिअल ईस्टेट पोर्टलद्वारे भारतातील प्रमुख शहरांची या अनुषंगाने पहाणी केली गेली होती. त्यात पुण्याची स्थिती अन्य आठ शहरांच्या तुलनेत अत्यंत चांगली असल्याचे आढळून आले आहे. या पाहण्यात जी आठ शहरे अभ्यासली गेली त्यात अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश होता.
दर हजारी माणसांमागे उपलब्ध असलेले रुग्णालय बेड्स, हवेचा दर्जा, पाण्याचा दर्जा, सांडपाणी व्यवस्था, राहणीमान निर्देशांक या निकषांच्या आधारे ही पाहणी करण्यात आली. यात सर्वाधिक म्हणजे चाळीस टक्के गुण रुग्णालयांतील बेड्सची उपलब्धता याला दिले गेले. पुण्यात दर एक हजार माणसांमागे रुग्णालयातील बेड्सचे प्रमाण हे साडेतीन इतके आहे. हे प्रमाण भारताच्या एकूण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा खूपच अधिक आहे. संपूर्ण भारतात सरकारी हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडचे प्रमाण हे केवळ अर्धा बेड आणि खासगी हॉस्पिटलमधील बेडचे प्रमाण 1.4 बेड्स इतके आहे. भारतात डॉक्टरांचे प्रमाणही अत्यंत कमी म्हणजे दर हजार माणसांमागे 0.86 टक्के इतके आहे.
पुणे शहरात हवा व पाण्याचा दर्जा, तसेच राहण्याच्या संबंधातील सुलभता याची स्थिती अन्य शहरांपेक्षा खूपच चांगली असल्याचे आढळून आले आहे. भारत हा आशियातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असली तरी या देशाला आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड खर्च करावा लागणार आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पुण्याखालोखाल बेडच्या उपलब्धतेबाबत अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर, बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजधानी दिल्ली व एनसीआरचा परिसर या पाहणीत शेवटच्या क्रमांकावर गेला आहे त्याचे प्रमुख कारण तेथील खराब हवा हे आहे. आरोग्य सुविधांच्या व्यवस्थेत मुंबई शहराचा चौथा क्रमांक लागला आहे.