पुणे – आता गुरूवारीही येणार पाणी

कपातीनंतरच्या पाणी-बाणीवर प्रशासनाचा उपाय

पुणे – महापालिकेकडून दर गुरूवारी करण्यात येणारी अघोषित पाणीकपात मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

धरणांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरात दर गुरूवारी पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, गुरूवारी पाणी बंद ठेवल्यास शहरातील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यास तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. तसेच वापरल्या जाणाऱ्या पाण्यात कोणतीही बचत होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे गुरूवारीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

महापौर म्हणाल्या, “पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या मनस्तापाची व्यथा सर्वपक्षीय नगरसेवकांनी शनिवारी झालेल्या मुख्यसभेत मांडली. या पार्श्‍वभूमीवर धरणांतील उपलब्ध पाणी तसेच महापालिकेची दैनंदिन गरज याचा आढावा घेऊन पाणी वितरण पुन्हा सुरळीत कसे करता येईल, यासाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी प्रशासनाने गुरूवारच्या पाणी बंदनंतरच्या अडचणींचा पाढाच वाचला. त्यात प्रामुख्याने गुरूवारी सर्व जलवाहिन्या रिकाम्या झाल्यानंतर त्यात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यास जलवाहिनीच्या आत असलेल्या हवेमुळे व्हॉल्व बिघडणे तसेच इतरही अडचणी येतात. त्यासाठी एअर व्हॉल्व असले, तरी ते नियंत्रित करण्यात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे शुक्रवार, शनिवार तसेच रविवारी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो. विशेष म्हणजे, या दिवशी पुणेकरांना पाणी वेळेत आणि पुरेशा दाबाने न मिळ्ण्याचे कारण तांत्रिक असले, तरी प्रत्यक्षात धरणांतील नियोजित पाणीसाठाच उचलला जातो. त्याचा फायदाही नागरिकांना होत नाही. त्यामुळे हा गुरूवारची पाणी बंदी रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रशासनाकडून “गुरूवारी पाणी बंद ठेवले नाही, तरी शहराला 15 जुलैपर्यंत एवढे पाणी असेल’ असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या पुढे गुरूवारीही पाणी पुरवठा नियमित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्याच वेळी महापालिकेनेही दररोज 1,350 एमएलडी व्यतिरिक्त जादा पाणी कोणत्याही स्थितीत घेऊ नये, अशा स्पष्ट सूचनाही पालिका अधिकाऱ्यांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

लष्कर जलकेंद्रावर सर्वाधिक परिणाम
महापालिकेने घेतलेल्या या पाणीबंदीचा सर्वाधिक फटका लष्कर जलकेंद्रातून शहराच्या पूर्व भागाला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याला बसत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पर्वती, एसएनडीटी या जलकेंद्राच्या बाबतीत ही वितरण समस्या कमी आहे. मात्र, त्याच वेळी लष्कर जलकेंद्र हे जवळपास 100 वर्षाहून अधिक जुने असल्याने त्याच्या जलवाहिन्या, साठवण टाक्‍या, एअर व्हॉल्व यांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×