पुणे – होर्डिंग्जचे आता दरवर्षी ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’

महापालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे – महापालिकेकडून शहरात परवानगी देण्यात आलेल्या जाहिरात फलकांना (होर्डिंग्ज) आता दरवर्षी स्ट्रक्‍चरल ऑडिट सादर करावे लागणार आहे. महापालिकेकडून यापूर्वी दोन वर्षांतून एकदा या होर्डिंग्जचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ फलक मालकांकडून करून घेऊन त्यानंतरच नूतनीकरणास मान्यता दिली जात होती.

मागील वर्षी मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकात रेल्वेच्या हद्दीतील जाहिरात फलक कोसळून चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरातील होर्डिंग्जच्या सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. तसेच शहरात अनेक फलक वर्षानुवर्षे उभे असून त्यांची अवस्था धोकादायक झाल्याचेही समोर आले होते. या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने अनेक सुरक्षात्मक उपाय योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यात फलकांची उंची जमिनीपासून कमी करण्यात आलेली आहे. त्याच वेळी प्रशासनाने होर्डिंग्जचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचाही निर्णय घेतलेला होता. मात्र, महापालिकेने मान्यता दिलेल्या 1,882 जाहिरात फलकांची मुदत 31 मार्च 2019 ला संपत असल्याने नवीन परवाना देतानाच “स्ट्रक्‍चरल ऑडिट’चा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, यावेळी परवाना नूतनीकरण करण्यासाठी प्रशासनाने दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला होता. आयुक्तांनी ही मुदतवाढ तीन महिन्यांसाठी दिली असली, तरी या पुढे प्रत्येक वर्षी सुरक्षिततेसाठी “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ सादरे करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.