जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी सुरू
पुणे – लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी दि. 23 मे रोजी होणार असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडलाच्या गोदामात तर शिरूर आणि मावळ मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणार आहे. या दोन्ही ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात असणार आहे.
लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. “ईव्हीएम’ मशीनवरील मतमोजणीसाठी 14 टेबल ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी 84 “ईव्हीएम’ मशीनची मोजणी होणार आहे. “ईव्हीएम’ मशीनची ने-आण करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. शिवाय, मतमोजणी कर्मचारी, उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी स्वतंत्र मार्ग ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. पोस्टल बॅलेटची मतमोजणीही याच ठिकाणी करण्यात येणार आहे.
मतदारसंघातील मतमोजणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर चार अधिकारी, कर्मचारी असणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक पर्यवेक्षक आणि एक शिपाई यांचा यात समावेश राहणार आहे. मतमोजणीच्या दिवशी कशा पद्धतीने कामकाज केले पाहिजे, त्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.