13 पं. स.वर आजपासून प्रशासक
पुणे – पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितींच्या सदस्यांचा कार्यकाळ 12 मार्चला संपला त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेसह 13 पंचायत समितीवर प्रशासक नेमण्याची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून शनिवारी काढण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील 13 पंचायत समितींवर आता प्रशासक राज असेल.
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांची मुदत संपण्याअधी गट आणि गण रचना याच महिन्यात जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवित अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली. प्रशासक आले तरी जास्तीत जास्त दोन महिने, त्यामध्ये निवडणुका पूर्ण होतील आणि पुन्हा सत्ता स्थापन होईल, असे अनेकांच्या मनात होते. मात्र, गट आणि गण रचना जाहीर न झाल्यामुळे आणि आता निवडणुका सहा महिने तरी होणार नसल्याचे संकेत मिळाल्यामुळे सदस्यांचा हिरमोड झाला. सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असल्यामुळे दररोज जिल्हा परिषदेमध्ये होणारी गर्दी पर्यायाने कमी होणार. हीच अवस्था पंचायत समितीमध्येही असेल.
जिल्ह्यातील 13 पंचायत समिती सदस्यांची मुदत शनिवारी संपली. त्यामुळे 13 मार्चपासून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हा, भोर, बारामती आणि इंदापूर या पंचायत समितीचा कारभार प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी हे पाहणार आहेत. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांची मुदत 20 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे 21 मार्चपासून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सर्व अधिकार जाणार आहे.