पुणे : रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. त्यावर सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या आहेत. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षा चालकांना नोटीसा काढण्यात आल्याचे आरटीओ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरात रिक्षाने प्रवास करायचे म्हटल्यावर तो शांततेत आणि विना वाद होईल याची शाश्वती कमीच. काही प्रामाणिक रिक्षाचालक वगळता, अन्य रिक्षाचालकांचा उद्धटपणा, प्रवासी भाडे, जादा पैसे घेणे यासह अनेक तक्रारी असतात. काही प्रवाशांना तर धक्कादायक अनुभव येतात. मात्र, या रिक्षाचालकांविरोधात तक्रार कुठे करायची, असा प्रश्न प्रवाशांसमोर येतो. आरटीओमध्ये जाऊन अथवा ई-मेलद्वारे तक्रार करता येणे शक्य होते. मात्र, तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट होती.
त्यामुळे आरटीओने रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू केला. या क्रमांकावर गेल्या काही महिन्यांत रिक्षा चालकांच्या १३५ तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये भाडे नाकारणे. गैरवर्त, जास्त पैसे घेणे अशा तक्रारी आहेत. यानुसार संबंधीत रिक्षा चालकांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाईला सुरूवात केली आहे.
हेल्पलाइनवरून रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी करण्याची सोय आरटीओने दिली आहे. त्यावर काही तक्रारी येत आहेत. तसेच, रिक्षा चालकांबाबत बऱ्याच तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आरटीओकडून रिक्षा चालकांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये तपासणी करून सर्व प्रकारची कारवाई केली जामणार आहे.
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे