करोना रुग्णांचा आकडा वाढतोय; मास्क आवश्यकच
पुणे – मुंबईसह राज्यातील शहरांत करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मुंबईमध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण अधिक असतानाच आता पुणे शहरातही तशीच स्थिती निर्माण होऊ लागल्याचे गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.
गेल्या आठवड्याभरात दिवसभरातील करोनाचा रुग्णांचा आकडा 100च्या वर पोहोचला आहे. मात्र, पुणेकरांना याचे गांभीर्य नसल्याचे तोंडावरून मास्क उतरल्याने तसेच शहरातील वाढत्या गर्दीतही सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणातून स्पष्ट दिसून येत आहे.
राज्य सरकार अद्याप तरी करोनाची चौथी लाट नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुंबईसह पुणे शहरातील रुग्णांची वाढती आकडेवारी ही चिंतेची असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे शहरात करोना पसरत आहे, मात्र, शहरातील सर्वच भागात वाढलेली गर्दीतून नागरिक यापासून पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. पुणे मंडई, तुळशीबाग, मार्केट यार्ड अशा गर्दीच्या ठिकाणी “प्रभात’ने केलेल्या पाहणीत नागरिक वर्दळीच्या भागात मास्क वापरताना दिसत नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रशासनाकडून याबाबतची काळजी घेतली जात नसल्याचे उघड आहे. करोना संपला असल्याच्या भ्रमात नागरिकांचा सर्वत्र वावर आहे. मात्र, प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे. अवघ्या आठवड्यातच शहरातील करोनाचा आकडा 225च्या वर तर सक्रिय रुग्णसंख्या हजारावर पोहोचली आहे.
करोना रुग्णांची आकडेवारी पाहता आरोग्यविभाग सज्ज झाला आहे. रुग्णांना वेळीच ओळखण्यासाठी टेस्टिंग वाढवल्या आहेत. पुणेकरांनी पहिल्या तीन करोना लाटांमध्ये खूप काही गमावले आहे. चौथी लाट सुरू होण्याआधीच थोपवायची असेल तर पुणेकरांनी किमान गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापरायला सुरू करावे.
– डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका
पुण्यातील करोना रुग्णसंख्या
दि.11-130, दि.12-106, दि.13-73, दि.14-137, दि.15-172,
दि.16-193, दि.17-214.