पुणे – फक्‍त हेल्मेटच नाही, तर त्याचा बेल्टही लावा

सुरक्षित प्रवासासाठी सल्ला

पुणे – शहरात मागील काही दिवसांत झालेल्या दोन अपघातात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करुनही त्यांचा मृत्यू झाला. वाहतूक पोलिसांनी केलेल्या पाहणीत दोन्ही अपघातातील दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र, त्यांनी हेल्मेटचा पट्टा (बेल्ट किंवा स्ट्रॅप) लावला नसल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे हेल्मेट परिधान करणाऱ्या दुचाकीस्वारांनी सुरक्षेच्या दृष्टीने पट्टा बांधावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेल्मेटचा पट्टा न लावल्यामुळे वाहनाने धडक दिल्यानंतर हेल्मेट रस्त्यावर पडले. त्यामुळे दोन दुचाकीस्वारांना गंभीर दुखापत झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आठवड्यापूर्वी हडपसर येथील किर्लोस्कर कंपनीजवळील उड्डाणपुलावर लष्करी अधिकाऱ्याच्या दुचाकीस्वार मुलीचा टॅंकरच्या धडकेने मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. या दोन्ही अपघातात दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते. मात्र, त्यांनी पट्टा लावला नव्हता, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.

…म्हणून पट्टा बांधावा
दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले तरी पट्टा लावण्यास विसरू नये. वाहनाने धडक दिल्यानंतर पट्टा न बांधलेले हेल्मेट पडते. त्यामुळे दुचाकीस्वाराला गंभीर स्वरुपाची दुखापत होते, असे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.