पुणे – पाणीकपातीचा आदेश नाही

अपव्यय नासाडी थांबविण्याचे महापौर मुक्ता टिळक यांचे आवाहन

पुणे – सद्यस्थितीत धरण साखळीतील शिल्लक पाण्याचे नियोजन केल्याचा दावा करून तूर्तास शहरात पाणी कपात केली जाणार नाही, असे महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पावसाळा लांबल्यास नियोजनाचा भाग म्हणून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सर्वांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापौरांनी केले.

मागीलवर्षी शेवटच्या टप्प्यात पावसाने हुलकावणी दिल्याने खडकवासला धरणसाखळीत पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे शहरात ऑक्‍टोबरपासून पाणी कपातीबाबत चर्चेला सुरूवात झाली. त्यात महापालिकेकडून दिलेल्या पाण्याच्या कोट्यापेक्षा अधिकचे पाणी वापरले जात असल्याचे आणि पाणीपट्टी थकित असल्याचे कारण देत पाटबंधारे विभागाने पुण्याच्या पाण्याला कात्री लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पाण्याचा पेटू पाहणारा वाद मिटवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला आणि त्याचाच भाग म्हणून पाटबंधारे खात्याने एक पाऊल मागे घेतले.

महापालिकेने लोकसभा निवडणुकीच्या एक महिन्याच्या कालावधीत एकदाही पाणी पुरवठा बंद ठेवला नाही. परंतु, काल जिल्ह्यातील शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना 2 मे रोजी दुरूस्तीच्या कारणास्तव शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे घोषित केले. केवळ निवडणुकीवर परिणाम म्हणून भाजपने सत्तेचा वापर करत निवडणुकीच्या काळात “क्‍लोजर’ घेतले नाही, अशी टीका विरोधकांकडून सुरू झाली. तर प्रशासनातही येत्या काही दिवसांत पाणी कपात करण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

त्यावर महापौर म्हणाल्या, “सध्या पाणी कपातीचा कुठलाही निर्णय झालेला नाही. धरण साखळीतील पाण्याचे 15 जुलैपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु, उन्हाळ्याची दाहकता आणि पावसाळा लांबल्यास पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. लवकरच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पाणी वापराबाबत निर्णय घेतले जातील.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.