पुणे : महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पाणी गळती रोखण्यास पालिकेस यश आले असले, तरी अनेक मुख्य जलवाहिन्या जुन्याच असून, त्या जमिनीखालून नक्की कुठून गेल्या आहेत, याचे नकाशेच महापालिकेकडे नाहीत. सध्या शहराला नवीन जलवाहिन्यांसोबत जुन्या जलवाहिन्यांमधूनही पाणीपुरवठा होत आहे. या जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती रोखण्यात प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा जलवाहिन्यांच्या नोंदी शोधून त्या बंद करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे.
शहरासाठी महापालिकेकडून दरवर्षी सुमारे १८ ते २० टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाकडून घेतले जात आहे. त्यातच महापालिकेस केवळ १४.६२ टीएमसी पाणीसाठा मंजूर असल्याने महापालिकेस वाढीव पाण्यासाठी पाटबंधारे विभाग तीनपट बिल आकारत आहे. त्याचबरोबर महापालिकेने जादा पाणी घेतल्याने शेतीच्या सिंचनासाठी पाणी कमी पडत असून, महापालिकेने पाणीवापर कमी करण्याची मागणी केली जात आहे. परिणामी महापालिका आणि पाणीपुरवठा विभागात नवीन वादाला तोंड फुटले आहे.
त्यामुळे महापालिकेकडून शहरासाठीच्या समान पाणी योजनेत शहराच्या वेगवेगळ्या भागांत नव्याने सुमारे १६०० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. याशिवाय या जलवाहिन्यांवर पाण्याचे मीटरही बसविले जात आहेत. त्यामुळे एकाच जलवाहिनीवरील दोन वेगवेगळ्या ठिकाणांच्या मीटरवरून नेमके कोणत्या भागात पाणी कमी जात आहे, तसेच जलवाहिनीला गळती आहे, हे शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.
मात्र, या नवीन जलवाहिन्या सुरू झाल्यानंतर जुन्या जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा बंद करणे गरजेचे आहे. मात्र, या जुन्या जलवाहिन्या कोठून आणि कशा जातात, तसेच जलवाहिन्यांचे जाळ कसे पसरले आहे, याचे नकाशे उपलब्ध नसल्याने पाण्याची गळती होत असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
नवीन जलवाहिनीवरून नळजोड देण्यात येत असले, तरी अद्यापही अनेक जुन्या जलवाहिन्या सुरूच आहेत. त्यांचे नकाशेच उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत.
– पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त महापालिका आयुक्त)