पुणे -केंद्र सरकारने 18 वर्ष वयापुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन ऍपवर नोंदणी सुरू केली आहे. मात्र, मागील साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरणासाठी सलग दुसऱ्या दिवशी लसच मिळाली नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. लसींच्या पुरवठ्याच्या या घोळामुळे लसीकरणाबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
शहरात 182 लसीकरण केंद्र असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत पुणे महापालिकेने आरोग्य सेवक, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षांवरील नागरिकांना सुमारे साडेसात लाख डोस दिले आहेत. तर केंद्र सरकारने येत्या 1 जानेवारीपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची घोषणा केली आहे. परंतू राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये मागणीच्या तुलनेत लसींचा पुरवठा कमी असल्याने मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला आहे.
पुण्यासारख्या शहरामध्ये काही केंद्र बंद ठेवावी लागत असून, उपलब्ध आहे, सकाळपासून रांग लावूनही नागरिकांना ती मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे. अशातच आज सलग दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारकडून राज्य सरकारमार्फत मिळणाऱ्या लसींचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आज शहरातील सर्वच केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. पुणे विभागाला बुधवारी 80 हजार लसींचा साठा राज्याकडून मिळाला. त्यामुळे सायंकाळी त्याचे वाटप करण्यात आले. मात्र ग्रामीण, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा यांना लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे जो काही साठा शहराला मिळेल तोही पुरणार नाही, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सध्या लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.
18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी महापलिका प्रशासन तयारी करत आहे. परंतू जोपर्यंत महापालिकेला पुरेशा प्रमाणात लसींचा पुरवठा होत नाही. तसेच लसीकरणासंदर्भात राज्य अथवा केंद्र शासनाच्या नवीन गाइडलाइन्स येत नाहीत, तोपर्यंत लसीकरण बंद ठेवण्यात यावेत. तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे सर्वच केंद्रांवर समप्रमाणात वाटप करून गोंधळ टाळण्यासाठी केवळ टोकन पद्धत अवलंबावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती