पुणे : प्रवाशांच्या सुविधेसाठी पीएमपीएमएलकडून ऑनलाइन तिकीट सुविधा सुरू केली आहे. मात्र, ऑनलाइन तिकीट काढल्यावर प्रवाशांच्या तिकिटावर मोबाइल क्रमांक, यूपीआय आयडीसह (व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस) छापून येत आहे. त्यामुळे या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता गृहित धरून पीएमपी प्रशासनाने तिकीटावर यूपीआय आयडी दिसणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पीएमपीतून पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पीएमपी प्रशासनाने गेल्या वर्षी पुणे दर्शनच्या दोन बसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन पेमेंटद्वारे तिकीट काढण्याची सुविधा सुरू केली होती. त्यानंतर ही सुविधा सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. आता प्रवाशांना तिकीट मशिनवरील कोड स्कॅन करून गूगल पे किंवा फोन पे वरून तिकिटाचे पैसे जमा करता येत आहेत. प्रवाशांमध्ये महिला आणि विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पीएमपी प्रशासनाने ऑनलाइन पेमेंट सुविधा सुरू केल्यानंतर आता बहुतांश प्रवासी ऑनलाइन पेमेंट करताना दिसून येत आहेत.
ऑनलाइन पेमेंटद्वारे काढलेल्या तिकिटावर संबंधित प्रवाशाचा यूपीआय आयडी छापून येत होता. अनेक प्रवाशांचा यूपीआय आयडी हा त्यांचा मोबाइल नंबर आहे. प्रवासानंतर प्रवासी तिकीट न फाडता फेकून देतात. त्यामुळे त्या तिकिटावरील माहिताचा गैरवापर होण्याची शंका प्रवाशांनी व्यक्त केली होती.
प्रशासनाने यूपीआय आयडी पूर्ण किंवा शेवटचे काही नंबर प्रसिद्ध करावेत, अशीही मागणी प्रवाशांनी केली होती. अखेर पीएमपी प्रशासनाने युपीआय आयडीचे सुरुवातीचे काही अंक, नाव येणार नाही, अशी सोय केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.