पुणे – तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावे खंडणी मागितल्याची तक्रार खोटी आहे. मला न्याय द्यावा. षड्यंत्र करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसहित रॅकेटमधील सर्वांवर कारवाई करावी,’ अशी मागणी निवृत्त पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत केली. या आशयाचे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांना पाठवले आहे.
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी धुमाळ यांच्यासह त्यांचे वकिल ऍड. रमेश जाधव उपस्थित होते. धुमाळ म्हणाले, “रश्मी शुक्ला यांच्या नावाने संदीप जाधव (रा. वीरभद्र सोसायटी,बाणेर) यांच्याकडून 25 लाख रु. मागितल्याच्या आरोपाखाली माझ्याविरुद्ध तक्रार करण्यात आली. त्यावर माझे निलंबन करण्यात आले. या प्रकरणी ऑडियो, व्हिडिओ रेकोर्डिंग पुरावे बनावट होते.
मात्र, मूळ रेकोर्डिंग हे स्पाय कॅमेराद्वारे केले होते. तो पुरावा चौकशी अधिकाऱ्यांनी न मिळवता बनावट रेकॉर्डिंगद्वारे चौकशी आणि कारवाई केली. त्यामुळे माझी, कुटुंबियांची, पोलीस दलाची बदनामी झाली. माझी अपिलीय सुनावणी लवकर घ्यावी, यासाठीचा पत्रव्यवहार करोनामुळे वेळेत न झाल्याने नाईलाजाने मला स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.’
“शिशिर कोशे यांच्या जमिनीवर संदीप जाधव व हेमंत गांधी यांनी पोलिसांच्या मदतीने ताबा घेतल्याच्या तक्रार अर्जाची चौकशी करत होतो. संजय मुथा याच्या कागदपत्रांचा वापर करून 30 वर्षांपूर्वी टाटा मोटर्स कंपनीच्या लोकांनी घेतलेल्या प्लॉटवर जाधव, गांधी यांनी काही जमिनींचा ताबा घेतला. त्यातील एक प्लॉट सुनील पवार यांनी पत्नीच्या नावावर जाधव आणि गांधी यांच्याकडून घेतला, याचीही चौकशी करावी. कोसे यांच्या तक्रारीवेळी यावेळी मी पुणे शहर गुन्हे शाखा (प्रॉपर्टी सेल) येथे कार्यरत होतो.
त्यामुळे चौकशीदरम्यान झालेल्या चर्चेचे संदीप जाधव यांनी बनावट रेकॉर्डिंगचे पुरावे सादर करून माझ्याविरुद्ध 25 लाख रु. मागितल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. यामध्ये सुनील पवार, अरुण सावंत आणि सुरेश मिरगे यांच्या सहभागाचीदेखील चौकशी व्हावी. संदीप जाधवच्या जमिनींचे पोलीस दलात कोण कोण लाभार्थी आहेत, हे शोधावे,’ अशीही मागणी धुमाळ यांनी केली आहे.