पुणे – सारसबाग खाऊगल्ली ते पेशवे पार्कच्या गेटपर्यंतच्या रस्त्यावर “नो पार्किंग’

पुणे – दत्तवाडी वाहतूक विभागांतर्गत सारसबाग खाऊगल्ली येथील रस्ता ते पेशवे पार्कच्या गेटपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला नो-पार्किंग झोन करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्‍त राहुल श्रीरामे यांनी याबाबतचे आदेश दिले.

अग्निशमन दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका ही अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व वाहनांसाठी नो-पार्किंग झोनचे पालन करणे बंधनकारक आहे. फेब्रुवारीमध्ये याबाबतचे आदेश दिले होते. यावर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. त्या लक्षात घेत वाहतूक शाखेने अंतिम आदेश जाहीर केला आहे.

सारसबागेच्या परिसरात असणारे विविध स्टॉल, खेळणी, विविध विक्रेते आदींनी रस्ता व्यापला आहे. यातच नागरिकांनी दुतर्फा वाहने उभी केल्यास रहदारीसाठी रस्ता उरत नाही. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होते, असे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पेशवे पार्क शेजारील पार्किंगचा पर्याय
नागरिकांना पेशवे पार्कच्या शेजारी असणाऱ्या पार्किंगमध्ये वाहने उभी करता येणार आहेत. मात्र, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत या ठिकाणची जागा अपुरी आहे. त्यामुळे सारसबाग, पेशवे पार्क या ठिकाणी ये-जा करणारे नागरिक आता बाजीराव रस्ता, सिंहगड रस्ता, सणस ग्राऊंडची मागील बाजू येथे वाहने उभी करण्याची शक्‍यता असून, यामुळे पुन्हा वाहतुकीचा प्रश्‍न येण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.