पुणे –सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास राज्यशासनाने मुभा दिली. पण, पुणेकरांसाठी पर्वणी असलेल्या दिवाळी पहाटचे कार्यक्रम रंगणार असले, तरी महापालिकेच्या उद्यानांत या कार्यक्रमांना बंदी असणार आहे. राज्यशासनाच्या आदेशात “दिवाळी पहाट’बाबत स्पष्ट उल्लेख न केल्याने महापालिकेने यंदा उद्यानात या कार्यक्रमांना परवानगी न देण्याच निर्णय घेतला आहे.
दरवर्षी दिवाळीमध्ये अनेक सामाजिक संस्था, प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या उद्यानांसह खासगी मंगल कार्यालये, लॉन्समध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करतात. यामध्ये विशेष करून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना पुणेकर भल्या पहाटे गर्दी करतात. गेल्यावर्षी शहरात करोनाचे निर्बंध असल्याने खासगी ठिकाणांसह उद्यानांमध्ये कार्यक्रम घेता आले नव्हते.
यंदा बहुतांश निर्बंध हटवले आहेत. दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सुमारे 16 संस्थांनी प्रस्ताव सादर केलेले आहेत. मात्र, त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय दरवर्षी पाडव्याच्या दिवशी सकाळी सारसबागेत दिवाळी साजरी केली जाते. मात्र, यावर्षी सध्याच्या करोना प्रतिबंधात्मक नियमानुसार सारसबागही सकाळी 6 नंतरच उघडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी यंदाही सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भेटीगाठींचा कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उद्यानांमध्ये मागणी करण्यात आलेल्या कार्यक्रमांबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.