पुणे – ब्रेनडेड नऊ वर्षीय मुलाच्या अवयवदानामुळे चार रुग्णांना जीवनदान मिळाले. या मुलाला मेंदु विकार झाल्याने इनलॅक्स आणि बुधरानी रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलाचे यकृत, स्वादुपिंड, दोन्ही मूत्रपिंड आणि फुफ्फुस हे अवयवय शहरातील विविध रुग्णालयांमधील रुग्णांना देण्यात आले.
संबंधित मुलाला दि. ३ जुलै रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ८ जुलै रोजी त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय चाचण्यांनंतर ९ जुलै रोजी अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या ( झेडटीसीसी) प्रतीक्षा यादीनुसार ज्युपिटर रुग्णालयात मूत्रपिंडाचा आजार असलेल्या ६४ वर्षीय पुरुषावर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
डेक्कन सह्याद्री रुग्णालयाला मूत्रपिंड आणि स्वादुपिंड देण्यात आले. पिंपरीतील डीपीयू रुग्णालयाला फुफ्फुस देण्यात आले आहे. रूबी हॉल क्लिनिक येथील रुग्णांसाठी यकृत देण्यात आल्याची माहिती “झेडटीसीसी’च्या आरती गोखले यांनी दिली.
कठीण परिस्थितीतही अवयवदान
मेंदूमृत मुलाच्या आईचे मागील वर्षी निधन झाले. तर ३ जुलै रोजी मुलाचा मेंदू विकाराने मृत्यू झाला. अशा परिस्थिती घरच्यांनी अवयवदानाला संमती देऊन चार जणांना जीवनदान दिले. तसेच आपल्या मुलाची आठवण अवयवरूपी ठेवली. दरम्यान, पुणे विभागात यंदा जानेवारी ते जुलै या कालावधीत ३६ मेंदूमृत अवयवदात्यांकडून अवयवदान करण्यात आले आहे. या आठवड्यात चार मेंदूमृत व्यक्तींचे अवयवदान करण्यात आले आहे.