पुणे – विद्यार्थ्यांच्या शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील प्रवास अपघातमुक्त आणि सुखकारक व्हावा. त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची अडचण येऊ नये. विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, या उद्देशाने महापालिकेकडून “सेफ स्कूल झोन’ संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक आराखडा तयार केला असून, त्याची अंमलबजावणी सोमवारपासून
(दि.12) खराडी, पर्वती तसेच डेक्कन परिसरातील 9 शाळांच्या परिसरात केली जाणार आहे. शहरात वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जातात. मात्र, त्या अपुऱ्या पडत आहेत. महापालिकेकडून करोडो खर्च करूनही वाहतूक समस्या तशीच आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना या समस्येला सामोरे जावे लागते. सायकल अथवा घरातून चालत जाणे देखील पालकांना आणि विद्यार्थ्यांना भीतीदायक वाटते. त्यामुळे पालक पैसे खर्च करून पाल्याला स्कूल व्हॅनने शाळेत पाठवतात.
काही वेळा किरकोळ अपघाताचे प्रकारही आढळतात. हीच समस्या ओळखून पथ विभागाने त्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित शाळा प्रवासासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील नऊ विभाग करून वाहतूक तज्ज्ञांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या प्रस्तावांमधून तीन विभागांत प्रायोगिक तत्वावर सोमवारपासून यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले…
या शाळांमध्ये राबविणार आराखडा
डेक्कन विभाग – विमलाबाई गरवारे प्रशाला, पंडित आगाशे शाळा विधी महाविद्यालय रस्ता, सिम्बायोसिस स्कूल
पर्वती विभाग – स्व. राजीव गांधी ई लर्निंग स्कुल, मुक्तांगण हायस्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल
खराडी – राजाभाऊ पठारे महाविद्यालय, पीडीईए हायस्कूल, पीडीईए संस्थेची ज्ञानांकुर शाळा
अशी असेल रचना…
शाळेकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती असेल.
स्कूल व्हॅनवगळता शाळा आवारात अन्य वाहनांना नो पार्किंग. पादचारी मार्गांवर रस्ता नियमांचे पट्टे आकर्षक पद्धतीने सजविलेले असतील.
मुलांना सायकल राइड, बस राइडची सुविधा असेल.
शाळा सुटण्याच्या, भरण्याच्या वेळेस वाहतूक नियमन.
शाळेतून सायकल अथवा पायी जाणाऱ्या मुलांना जाणे आणि येणे सोपे होईल