पुणे -‘निविदेची चौकशी न करताच निंबाळकरांची बदली’

महापालिकेसमोर उपरोधिक फ्लेक्‍स

पुणे – जलपर्णी निविदेची चौकशी न करताच अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली केल्याचा दावा करत महापालिकेसमोर उपरोधिक फ्लेक्‍स लावण्यात आले आहेत.

यामध्ये “नसलेली जलपर्णी काढणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी चालू असलेल्या अधिकाऱ्याची बदली का झाली.. हे पुणेकरांना कळतंय’ असे वाक्‍य आणि “चौकशीचा राक्षस’ असे लिहून राक्षसाचे चित्र काढले आहे. याशिवाय कमळाचे चित्र टाकून “आशीर्वाद’ असे लिहून, नसलेल्या जलपर्णीसाठी 23 कोटी असेही त्यामध्ये लिहिण्यात आले आहे.

जलपर्णी काढण्याच्या निविदेवरून महापालिकेत काही महिन्यांपूर्वी बराच गदारोळ झाला होता. निंबाळकर यांनी यामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप कॉंग्रेस सदस्यांनी केला होता. त्यावेळी निंबाळकर यांच्यावर कॉंग्रेस कार्यकर्ते धावून गेले होते. त्याचे पर्यावसान पोलीस तक्रारीत होऊन नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना अटक झाली होती; तर कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाला होता.

त्यावेळी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. असे असताना आता निंबाळकर यांची बदली झाली असून, ती त्यांना वाचवण्यासाठी हेतुपुरस्सर करण्यात आल्याचा शिंदे यांचा आरोप आहे. याच प्रकरणावरून महापालिकेसमोर लावण्यात आलेला हा फ्लेक्‍स सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)