पुणे – व्यावसायिकाची जमीन बळकाविण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे तसेच मारहाण करणे याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात आरोपी निलेश शेलार याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
निलेश उमेश शेलार (वय 40, रा. मानकर रेसिडेन्सी, संगम चौक, कोथरूड ) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मयत दीप्ती काळे तसेच नितीन मनोहर हमने (वय 31, कात्रज) याच्यासह आणखी दोघांविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मंगळवार पेठेत राहणार्या एका महिलेने फिर्याद दिली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत पोलिसांनी आरोपी निलेश शेलार याला अटक केली होती. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत गुरूवारी पोलिसांनी ताब्यत घेत गुरूवारी न्यायालयात हजर केले.
आरोपीने गंभिर स्वरूपाचा गुन्हा केला असून गुन्ह्यांतील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना अटक करणे, गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल आरोपीने कोणाकडून आणले याचा तपास करणे तसेच ते जप्त करणे त्याने अशाप्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याचा शोध घेण्यासाठी दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिल सुरेखा क्षीरसागर यांनी केली.