वाघोली – बकोरी तालुका हवेली येथील ओसाड डोंगरावर वनराईची निर्मिती करून त्यामध्ये ५० हजार पेक्षा जास्त झाडे लावून समाजामध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करून निसर्गाचा समतोल राखल्याबद्दल वृक्षप्रेमी चंद्रकांत गोविंद वारघडे यांचा वाघोली क्रिकेट असोसिएशन आणि युवराज कटके सोशल फाउंडेशन कडून नुकताच समाज भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
वाघोली क्रिकेट असोसिएशन व युवराज कटके फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
त्यामध्ये बकोरी देवराई वनराई प्रकल्पाचे संस्थापक चंद्रकांत वारघडे तसेच वाघोली येथील केसनंद फाटा आणि परिसरामध्ये नेहमीच वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी अनेक वर्षांपासून अहोरात्र कष्ट घेणारे संपत गाडे, केसनंद गावामध्ये बाबामहाराज वृक्ष संवर्धन समिती आणि झाड फाउंडेशनच्या माध्यमातून तलाव निर्मिती आणि ५० हजार पेक्षा जास्त झाडे लावून वृक्षारोपणामध्ये आपला वेगळा ठसा उमटविणारे केसनंद गावचे माजी सरपंच दत्तात्रय हरगुडे आणि चंद्रकांत नाकतोडे या मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, अनिल सातव पाटील, समीर भाडळे, संदीप सातव, संपत गाडे यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यक्रमाचे आयोजक युवराज कटके सोशल फाउंडेशन आणि वाघोली क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.