पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ८३ हजार ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात १ लाख ४७ हजार ५६८ पुरुष, तर १ लाख ३५ हजार ४७२ महिला व १८ अन्य मतदारांचा समावेश आहे. यंदा एकूण ५६.२१ टक्के अंतिम मतदान झाले असून, २०१९ मध्ये ४६.९७ टक्के मतदान झाले होते. या वेळी मतदानामध्ये ९.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
निवडणुकीच्या रिंगणात एकूण १६ उमेदवार होते, तर ४४८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारसंघात ५ लाख ३ हजार ५३९ मतदार असून, २ लाख ५९ हजार ४५३ पुरुष, तर २ लाख ४३ हजार ९८४ महिला मतदार आहेत. १०२ पारलिंगी मतदार आहेत. बुधवारी (दि. २०) पुरुषांचे मतदान ५६.८८, महिलांचे ५५.५२ टक्के मतदान झाले.अन्य मतदारांचे १७.५६ टक्के मतदान झाले.
तांत्रिक बिघाडामुळे चार मतदान केंद्रांतील ईव्हीएम मशिन बंद पडले होते. यात कळस येथील एमजीएम स्कूल, विश्रांतवाडी येथील जनता हायस्कूल, चंदनगरमधील हंबीरराव कृष्णराव मोझे शाळा, खराडी येथील आदर्श प्राथमिक शाळा येथील मशिनचा समावेश आहे. बिघाड झालेले मशिन बदलल्यानंतर मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरू झाली.