Pune News : पुणे-अजनी (नागपूर) वंदेभारत एक्सप्रेला प्रवाशांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला मोठी प्रतीक्षा यादी असल्याने डबे वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. गेल्या आठ महिन्यांत दीड लाख प्रवाशांनी वंदेभारत सेवेचा लाभ घेतला आहे. यातून रेल्वेला २० कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. पुणे-अजनी (नागपूर) वंदेभारत सेवा १० ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झाली. आठवड्यातील सहा दिवस ही गाडी धावते. खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अवघ्या १२ तासांत नागपूरला जाता येते. सण, उत्सवासह उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांमध्ये गाडीचे बुकिंग १४५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे. सध्या ही गाडी आठ डब्यांची असून, त्यामध्ये एक एक्झिक्युटिव्ह क्लास आणि सात चेअर कार आहे. अहिल्यानगर, मनमाड, भुसावळ आणि अकोला मार्गे धावणारी ही गाडी मध्य रेल्वेसाठी सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी आघाडीची ट्रेन आहे. गाडीला दौंड कार्ड लाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा (अमरावती) आणि वर्धा याठिकाणी थांबे आहेत. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पुणे-नागपूर खासगी बसचे तिकिट दर ४ ते ५ हजारांवर जाते. पुणे-नागपूर वंदेभारत एक्सप्रेसमुळे दोन ते तीन हजार ८०० रूपयांत वातानुकुलीत, सुरक्षित आणि जलद प्रवास करता येतो. पुणे-अजनी (नागपूर) वंदेभारत एक्सप्रेस (एकूण १९९ फेऱ्या) क्लास प्रवासी संख्या मिळालेले उत्पन्न चेअर कार – १ लाख ३६ हजार ८२३ १७ कोटी २३ लाख ८९ हजार ३३० एक्झिक्युटिव्ह क्लास – ११ हजार ९४५ ३ कोटी १५ लाख ९७ हजार ९७३ सर्वाधिक लांबीची वंदेभारत पुणे-अजनी (नागपूर) वंदेभारत एक्सप्रेस ही ८८१ किमी अंतराची देशातील लांब पल्ल्याची गाडी आहे. दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली-वाराणसी वंदेभारत एक्सप्रेस असून, अंतर ७५९ किमी आहे. त्यानंतर राणी कमलापती (भोपाळ) – हजरत निजामुद्दीन (नवी दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेसचे अंतर ७०२ किमी, विशाखापट्टणम-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसचे अंतर ६९८ किमी तर अजमेर – चंदीगड वंदे भारत एक्सप्रेसचे अंतर ६९१ किमी आहे.