पुणे – पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह सिंहगड रस्ता, कोथरुड, स्वारगेट, विश्रांतवाडी, हडपसर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळाली. रस्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डयांमुळे वाहतूक आणखीनच संथ झाली होती. यातच दिवसभर पावसाच्या सरी बरसत असल्याने चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली होती.
भर पावसात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत होते. मात्र कोंडीतुन मार्ग काढण्यासाठी एकमेका पुढे वाहन दामटवण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी विनाकारण कोंडी झाल्याचे चित्र होते. मागील तीन चार दिवसांपासून हेच चित्र अनेक ठिकाणी दिसत होते. शहरात पावासामुळे बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
यामुळे वाहतूक खुपच संथ गतीने सुरु आहे. अनेक ठिकणी सिग्नलपाशीच खड्डे असल्याने सिग्नल सुटूनही वाहने पटकन पुढे निघत नाहीत. यातच पाऊस असल्याने मो ठ्या प्रमाणात चारचाकी वाहने शहरात बाहेर निघाली आहेत. अरुंद रस्त्यावर चारचाकी वाहनांमुळे कोंडीत भर पडली होती.
शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, सारसबाग परिसर, पर्वती, महर्षीनगर, मुकुंदनगर, बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक सर्वत्रच वाहतूक कोंडीचे चित्र होते. पावसामुळे काही ठिकाणची सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली होते. तेथे वाहतूक पोलिसांनी सिग्नल हातावर घेतला होता. मात्र नागरिक वाहने पुढे दामटण्याच्या नादात आणखीनच कोंडी करत होते.
खडकवासला धरणातून मुठा परिसरात विसर्ग वाढल्याने डेक्कन परिसरातील भिडे पुल आणि नदीपात्रातील रस्ता खबरदारी म्हणून बंद करण्यात आला आहे. याचाच परिणाम म्हणून जंगली महराज रस्ता आणि पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान मागील काही दिवसांत वाहतूक पोलिसांकडू शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची पहाणी करण्यात आली. त्यात ३३७ चौकांमधील ५५४ ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून आले. संततधार पावासामुळे खड्डे बुजवले जात नाहीत. याप्रकारच्या खराब रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
गणेश कला क्रिडा मंच येथे शिवसेनेच्यावतीने उध्दव ठाकरे यांच्या मेळाव्याचे सकाळी साडेदहा वाजता आयोजन करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक चारचाकी वाहने करुन तेथे आले होते.
त्यांनी आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली होती. मात्र ठाकरी काही तास उशीरा आले. यामुळे पार्क केलेल्या वाहनांमुळे स्वारगेट परिसरातील सर्व चौकांत वाहतूक कोंडी झाली. कार्यक्रम उशीरा संपल्याने कार्यकर्त्यांची वाहने बाहेर पडताच पुन्हा वाहतूक कोंडी झाली.
सातारा रस्ता बीआरटी मार्गात पंचमी हॉटेल परिसरात बसला ओव्हर टेक करताना समोरून येणाऱ्या बुलेटला धडकून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. विजय डोईफोडे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हि घटना शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. जखमी तरुणाला नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. यामुळेही काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.