पुणे – कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर पोलीस, महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य हॉटेल चालकांवर कारवाईचा चांगलाच बडगा उगारला होता. महापालिकेने आठवडाभरात तब्बल ५५ हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती.
तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तब्बल ६५ पब, रेस्टॉरंट आणि बारवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती. यामुळे हॉटेल व्यवसायीक नियम पाळतील अशी आशा होती. मात्र विमाननगर येथे एका हॉटेल चालक नियमांना बगल देत पहाटेपर्यंत हॉटेल चालवत होता. या हॉटेलच्या दोन मालकांसह चौघांवर विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल मालक संदीप सहस्त्रबुध्दे(रा.विमाननगर), सुमीत चौधरी(रा.विमाननगर), व्यवस्थापक अक्षय खिलारे व हिमांशु चौधरी अशा चौघांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार कपिल भाऊसाहेब भाकरे यांनी तक्रार दिली आहे.
अंमलदार कपिल भाकरे हे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना त्यांना पहाटे तीनच्या सुमारास हॉटेल एस्काडा(साई ॲपेक्स बिल्डींग, चौथा मजला, विमाननगर) हे सुरु असल्याचे निदर्शनास आले. हे हॉटेल शासनाने ठरवून दिलेल्या शर्तीपेक्षा जास्त वेळेपर्यंत चालवून आदेशाचे उल्लंघन करत होते.
यामुळे भाकरे यांनी उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांना बोलावून हॉटेलची तपासणी केली. तेथे काऊंटरवर व्यवस्थापक अक्षय भिलारे उपस्थित होता. पहाटे तीनच्या सुमारासही हॉटेलमध्ये ग्राहकांची ये जा सुरु होती. तेथे ग्राहकांना सुविधा पुरविल्या जात होत्या. यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलीस वेळोवेळी हॉटेल चालक आणि अस्थापनांना हॉटेल वेळेत बंद करण्याबाबत लेखी आणि तोंडी सुचना देत आहेत. तसेच रात्रगस्तीवरील कर्मचाऱ्यांनाही हॉटेलांची तपासणी करावयास सांगत आहेत. यानंतरही काही हॉटेल चालक चोरी छुपे हॉटेल चालविण्याचा प्रयत्न करत आहेत.