पुणे : डायग्नोस्टिक सेंटरमधील एक्सरे व इतर मशिन हाताळण्याचा कोणताही अनुभव नसताना ते हाताळून रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी एका महिला डेंटीस्टसह तीची सहकारी महिला डॉक्टर आणि कर्मचारी अशा तीघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात तक्रार खुद्द महिला डॉक्टरच्या पतीनेच दिली आहे.
याप्रकरणी स्वप्निल देवरुखकर (३२,रा. विश्रांतवाडी) याच्यासह दोन महिला डॉक्टरांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या १२५, ३५१(२), ३२४(२), ३(५) कलमानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे विमाननगर येथे लाईफबेरीज हेल्थ केअर नावाचे डायग्नोस्टीक सेंटर आहे.
तेथे येणाऱ्या रुग्णांच्या तपासणीकरीता त्यांच्याकडे ब्रीव्हो एक्सआर, एक्ट्रॉनिक्स इमॅजिंक सिस्टीम आणि केअर थ्री व्हिटा सी.आर सिस्टम आदी मशिन्स आहेत. हे मशिन चालविण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले असून त्याचा परवाना त्यांना भारत सरकारच्या परमानु उर्जा नियामक मंडळाकडून मिळालेला आहे.
ते २ डिसेंबर रोजी सेंटरमध्ये गेले असता, त्यांना त्यांची डॉक्टर पत्नी , तीची सहकारी डॉक्टर आणि कर्मचारी देवरुखकर हे एख्स रे काढत असताना दिसून आले. त्यांना मशिन चालविण्याचे प्रशिक्षण नसताना मशिन का ? हाताळले अशी विचारणा करण्यात आली.
मात्र ते काहीही न बोलता निघुन गेले. त्यांनी स्स्टिीमची पहाणी केली असता, त्याला पासवर्ड टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. परवाना आणि प्रशिक्षण नसताना देखील त्यांनी क्लिनिकमधील रुग्णांचा एक्सरे काढून रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण केला आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.