Pune News : दोघांनी आळंदी येथे पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले. मात्र, लग्नानंतर महिन्यातच पत्नीला पतीची आर्थिक परिस्थिती व जीवनशैली अपक्षेप्रमाणे नसल्याचे जाणवले आणि तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांमधील मतभेद कोर्टात घटस्फोटासाठी दाखल झाले. अखेर यामध्ये संवादातून तोडगा काढला. परस्पर संमतीने सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) अशोक सुपेकर यांनी घटस्फोट मंजूर केला. स्मिता आणि राकेश (नाव बदललेले) यांचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी पतीपेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. दोघांनी पालकांच्या इच्छेविरुद्ध आळंदी येथे लग्न केले. मात्र, लग्नानंतर महिन्यातच पत्नीला पतीच्या आर्थिक स्थितीची जाणीव झाली. यामुळे तिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कालांतराने दोघांतील मतभेद वाढले आणि मार्च २०२५ मध्ये हे प्रकरण कंटेस्टेड डिव्होर्स म्हणून न्यायालयात दाखल झाले. पत्नीच्या वकिलांनी पोटगीसाठी अर्ज दाखल केला होता. पतीची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने त्याला पोटगी देणे शक्य नव्हते. अखेर ॲड. शुभांगी विनायक टेमगिरे यांनी दोन्ही पक्षांमध्ये संवाद प्रस्थापित केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रकरण वादातून परस्पर संमतीच्या घटस्फोटात परिवर्तित झाले. कायदा केवळ वाद सोडविण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखविण्यासाठी आहे. आजच्या तरुण पिढीसाठी हा महत्त्वाचा धडा आहे. भावनांच्या भरातील निर्णय दीर्घकालीन परिणाम घडवू शकतात. त्यामुळे लग्नासारख्या निर्णयाकडे केवळ भावनिक दृष्टिकोनातून न पाहता, त्यातील जबाबदाऱ्या, दीर्घकालीन परिणाम म्हणून गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. – ॲड. शुभांगी विनायक टेमगिरे