पुणे -पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती पोलीस पदक, 25 पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता 45 पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
अतिरिक्त पोलीस महासंचालक आशुतोष डंबरे, उपनिरीक्षक अशोक उत्तम अहिरे, उपनिरीक्षक विनोदकुमार तिवारी यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले. तर केंद्रीय राखीव पोलीस दलातील हवालदार सुनील दत्तात्रय काळे यांना मरणोत्तर शौर्य पदक जाहीर करण्यात आले.
पुण्याच्या गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्त सुरेंद्र मधुकर देशमुख, दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील उपनिरीक्षक संतोष जाधव, पुण्याच्या विशेष शाखेतील विजय नारायण भोसले आणि पॉल राज अँथनी, यांसह रेल्वे पोलीस दलातील निरीक्षक सुधीर पांडूरंग शिंदे आणि उपनिरीक्षक भीमप्पा देवप्पा सागर यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
सागर आणि शिंदे यांना मिळालेल्या पदकाबद्दल पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी या दोन्ही निरीक्षकांचे अभिनंदन केले असून, पदक घोषित झाल्याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
विजय भोसले आणि पॉल अँथनी हे दोघेही विशेष शाखेत कार्यरत आहेत. दोघांचेही वास्तव्य खडक पोलीस लाईनमध्ये आहे.