पुणे : सोसायटीच्या आवारात मुलांची दंगामस्ती सुरू असताना, मुलीला ‘सामोसा’ म्हणून चिडविल्याच्या, तसेच तिच्या दिशेने प्लॅस्टिकच्या कचरा पेटीला लाथ मारल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलाला कानशीलात लगावल्याने त्याची शुद्ध हरपली.
या मुलाच्या कानाच्या पडद्याचा आतील भाग आणि उजव्या जबड्याला सूज आली असून, त्याला मारणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या मुलाच्या आईने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडली.
सोसायटीत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने रहिवाशांच्या लहान मुलामुलींना खाऊ वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्व मुले-मुली आपसांत खेळत होते.
त्यामुळे तक्रारदार आपल्या घरी गेल्या. त्यांचा मुलगा आणि आरोपीची मुलगी आपसांत खेळताना दंगामस्ती करत होते. त्यावेळी मुलीने मुलाच्या हातावर ओरबडले. त्यामुळे मुलाने तिथे असलेल्या प्लॅस्टिकच्या कचरापेटीला तिच्या दिशेने लाथाडले.
त्यावेळी मुलीच्या वडिलांनी पाठीमागून येत मुलाच्या उजव्या कानशीलात दिली. त्यामुळे मुलगा कळवळून दहा मिनिटे सुन्न होऊन खाली पडला. त्याची शुद्ध हरपली होती. थोड्या वेळाने त्यांचा मुलगा रडत घरी आल्यावर तक्रारदारांना हा प्रकार समजला.