पुणे : पुण्यातील उपाहारगृहातील व्यवस्थापकाने ३१ लाख ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी व्यवस्थापकाविरुद्ध डेक्कन पोलिसंनी गुन्हा दाखल केला. अमोल अर्जुन भुसाळे (रा. हर्षवर्धन काॅम्प्लेक्स, दगडे पाटीलनगर, शिवणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.
याप्रकरणी उपाहारगृहाचे मालक विजय प्रभाकर आवटी (रा. करिश्मा सोसायटी, कोथरूड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आवटे यांचे एरंडवणे भागात उपाहारगृह आहे. आरोपी अमोल भुसाळे त्यांच्या उपहारगृहात व्यवस्थापक म्हणून काम करीत होता.
उपाहारगृहात येणाऱ्या ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने जमा केलेली रक्कम त्याने उपाहारगृहाचे मालक आवटी यांच्या खात्यावर जमा केली नाही. ही रक्कम त्याने ग्राहकांना स्वत:च्या खात्यावर जमा करण्यास सांगितले. गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने भुसाळेने स्वत:च्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ३१ लाख ६२ हजार रुपये जमा करून घेतले.
उपाहारगृहात जमा झालेल्या रकमेबाबत संशय आल्याने आवटी यांनी चौकशी केली. तेव्हा व्यवस्थापक भुसाळेने अपहार केल्याचे उघडकीस आले. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.