Pune News: वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर आव्हाळवाडी फाटा ते बाईफ रोड दरम्यान रस्त्याच्या कडेला नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करण्यास लोणीकंद वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी जवळपास ३० वाहनांवर टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करण्यात आली आहे.
पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत होणारी वाहतूक कोंडी व महामार्गाच्या कडेला दोन्ही बाजूंनी वाहनांची पार्किंग करून महामार्गाने जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने वाघेश्वर चौक ते लाईफलाईन हॉस्पिटलपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात आली आहे.
त्याबाबतचे आदेश यापूर्वी काढण्यात आले आहेत. नो पार्किंगचे आदेश असूनही महामार्गाच्या कडेला दुचाकी चारचाकी वाहने बिनधास्त लावली जातात. सदरच्या वाहनांवर पोलीस विभागाकडून दंड आकारला जातो मात्र पार्क केलेल्या दुचाकी पुन्हा त्याचठिकाणी लावल्या जातात. लोणीकंद वाहतूक विभागाने बुधवारी (दि.२१) टोईंग व्हॅनद्वारे कारवाईस सुरुवात करून कारवाई केली आहे. टोइंगची कारवाई यापुढे वाहतूक विभागाकडून सुरु राहणार आहे.