– (संजय कडू)
पुणे : दिवाळीला गावाला जाण्याआधी बडी रक्कम हातात पडावी म्हणून कट रचून उत्तर प्रदेशातील दोघांनी एका गोडावूनमधून तब्बल २८० लॅपटॉप चोरले. या कटात त्यांनी आणखी काही जणांना सामिल करुन घेतले. मात्र बडी रक्कम तर हातात पडलीच नाही, हातात पडल्या त्या बेड्या. आता त्यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार आहे.
वाघोली परिसरातील एक गोडाऊन फोडून चोरट्यांनी तब्बल 280 लॅपटॉप चोरले होते. नव्या वाघोली पोलीस ठाण्याचे कामकाज नुकतेच सुरु होताच ही घटना घडली. यामुळे वाघोली पोलिसांपुढे आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी प्राथमिक तपास करुन गोडाऊनमधीलच एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला.
यानंतर अधिक तपासात त्यांना चोरी करताना सीसीटीव्ही कोणीतरी बंद केल्याचे आढळले. यामुळे गोडावूनमधीलच कर्मचारी सहभागी असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले. त्यांनी मुख्य आरोपी सुरेश महादेव कुमार( ३५, रा.होलवड, उत्तरप्रदेश) यांचा माग काढला. तेव्हा तो उत्तर प्रदेशला गेल्याचे आढळले.
जाताना त्यांनी भाड्याच्या घरातील त्याचे कोणतेही सामान सोबत नेले नव्हते. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या दोघांचा शोध घेण्यात आहे. शिवाजी जगन्नाथ वसु(२७, रा.छ.संभाजीनगर) आणि कुमुद रंजन झा(३२,रा.वाघोली) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
या दोघांच्याही पिकअप आहेत. त्यांनी गोडाऊनमधील माल छ.संभाजीनगर आणि तेथून प्रयागराज येथे नेण्यास मदत केली होती. यानंतर सुरेश कुमारला उत्तरप्रदेशातून परत येताना औरंगाबाद येथे ताब्यात घेण्यात आले. या तीघांनाही अटक करण्यात आली आहे.
वीस हजारात ९ लॅपटॉप विकले :
सुरेश कुमार दोन महिण्यापुर्वीच अर्कलाईन लॉजिस्टीक ॲण्ड वेअर या गोडाऊनमध्ये मजुर म्हणून कामाला लागला होता. त्याचा मित्र तेजप्रकाश हा एका फर्निचरच्या कारखान्यात कामाला आहे. दोघांनी दिवाळीत गावाला जाण्याआधी मोठी रक्कम कशी नेता येईल असा विचार केला होता. तेव्हा सुरेशकुमारने गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात लॅपटॉप असल्याचे सांगितले.
त्यानूसार त्यांनी कट रचून माल वाहण्यासाठी ओळखीच्या वसु आणि झा या पिकअप चालकांशी संपर्क साधला. औरंगाबादपर्यंत गाडी गेल्यावर त्यांच्याकडील पैसे संपले. यामुळे त्यांनी पुढील प्रवासाच्या खर्चासाठी तेथे लॅपटॉप विकण्याचा प्रयत्न केला. पण कोणीच माल घेत नसल्याने एका छोट्या दुकानदाराला अवघ्या वीस हजारात ९ लॅपटॉप दिले. तर आणखी एकाला ९ लॅपटॉप दिले.
तर रस्त्यात भेटणाऱ्या काही वाहन चालकांनाही एक दोन लॅपटॉप हजार दोन हजारात विकले. लॅपटॉपचा माल गाडीतून उतरवणाऱ्यालाही मजुरी म्हणून लॅपटॉप देऊन टाकला होता. त्यांच्याकडून २४४ लॅपटॉप आणि दोन पिकअप गाड्या असा १ कोटी एक लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपायुक्त(परिमंडळ ४) हिंम्मत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, योगेश खटके, पोलीस अंमलदार अजित फरांदे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, संदीप तिकोणे, विशाल गायकवाड, बाळासाहेब हराळ, सागर कडु, गणेश आव्हाळे, दिपक कोकरे, प्रतिम वाघ, महिनिनाथ बोयने यांच्या पथकाने केली.