पुणे – इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे एआयएसएसएमएस येथे इनोव्हेट यु टेकाथॉन २.० या राष्ट्रीय पातळीवरील हॅकेथॉन स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन येत्या २२ व २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून राज्यभरातील सर्व विद्यापीठातील तसेच सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.
स्पर्धक विद्यार्थ्यांना सात विषय संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी दिले आहेत. या स्पर्धेत विजयी व सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शिक्षण आणि संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात.
स्पर्धेमधून समाजोपयोगी संशोधन निर्माण व्हावे, उद्योजकांना पूरक असणाऱ्या संशोधनाची निर्मिती व्हावी, समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी आवश्यक संशोधन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाहेर यावे, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे, असे कल्पेश यादव यांनी यांनी स्पष्ट केले आहे.
हॅकाथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी innovateyou.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. इनोव्हेट यु टेकाथॉन स्पर्धेसाठी एज्यूटेक, ट्राफिक मॅनेजमेंट, स्टुडन्ट इनोवेशन , एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट , हेल्थ केअर , अॉग्रीकल्चर आदी विषय देण्यात आलेले आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रतन टाटा यांच्या स्मरणार्थ रतन टाटा इनोव्हेटिव्ह माईंड अवॉर्ड आणि बेस्ट इनोवेशन युजिंग अवॉर्ड दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे दहा हजार रुपये रक्कमेची ३५ स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे.
त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन एआयएसएसएमएसच्या आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने आणि संजय ससाणे यांनी केले आहे.