पुणे – बेकायदेशीर गावठी पिस्तूल हाताळताना मित्राच्या हातून दुसऱ्या मित्रावर गोळी झाडली गेली. यामध्ये रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल झाल्यावर ही घटना लपविण्याचा प्रयत्न केला.
मात्र वैद्यकीय तज्ञांनी पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे दोघांचेही बिंग फुटले. याप्रकरणी गोळी झाडणाऱ्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ही घटना शनिवारी रात्री कोंढवा येथे घडली. घटनेत जखमी झालेला प्रदीप सावंत हा उपचारासाठी आंबेगावातील विल्वर जुबली रुग्णालयात दाखल झाला.
तेथे त्याने अंगाला गोळी लागल्याची बाब डॉक्टरांपासून लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारादरम्यान गोळी लागल्याचे उघड झाले. तेथून आंबेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी सावंतकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, त्याचा मित्र अनिल चव्हाण हा बेकायदेशीर आणि विनापरवाना गावठी पिस्तूल हाताळत होता. त्यावेळी गोळी सुटून खांद्याला लागून दुखापत झाली. यानंतर अनिल चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.